विरार: बाचाबाचीनंतर एका महिलेने रिक्षाचालकाला भर रस्त्यात भोसकले. मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील विरारमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. महिला आणि रिक्षाचालकाने परस्परांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विरारच्या पश्चिमेकडे दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला आणि रिक्षाचालकांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या कानशिलात लगावल्याचे या व्हिडिओत दिसते. विरारच्या अगरवाल सिटी परिसरात ही घटना घडली.

मंजीती कौर-भोसले (वय ५०) या दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यांच्या दुचाकीची धडक दुर्गेश पाटील (वय ३५) याच्या रिक्षाला लागली. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दुर्गेशने रागाने महिलेच्या कानशिलात लगावली. महिलेने तिच्याजवळील कृपाण बाहेर काढले आणि दुर्गेशच्या पोटात भोसकले. या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या इतर रिक्षाचालकांनी मोबाइलमध्ये काढला.

वादानंतर रिक्षाचालक आणि संबंधित महिला अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी परस्परांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here