म. टा. प्रतिनिधी, सांगली: अनोळखी तरुणीने व्हिडिओ कॉल करून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विश्वास संपादन करून व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ तयार केले. यानंतर अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत १५०० रुपये गुगल पे अकाउंटवर जमा करण्यास भाग पाडले. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सांगली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलानगर येथील २० वर्षीय तरुणाने प्ले स्टोअरवरून एक अॅप डाउनलोड केले होते. या अॅपवरून त्याला एका अज्ञात तरुणीचा मैत्री करण्यासाठी मेसेज आला. अॅपद्वारे दोघांमध्ये संवाद सुरू होता. कालांतराने त्या तरुणीने प्रेमाचे नाटक करून तरुणाचा विश्वास संपादन केला. यानंतर व्हिडिओ कॉल करून त्याला नग्न होण्यास सांगितले. व्हिडिओ कॉलमधून त्याचे नग्नावस्थेतील चित्रीकरण करून घेतले. अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिने पैशांची मागणी केली. तरुणाने १५०० रुपये तिच्या गुगल पे अकाउंटवर जमा केले. यानंतर तिने आणखी पैशांची मागणी करीत ब्लॅकमेलिंग सुरू केले.

घाबरलेल्या तरुणाने हा सर्व प्रकार घरात आईला सांगितला. आईने मोबाइल नंबरवरून त्या तरुणीशी संपर्क साधला. मात्र, तिने आईकडेही १५०० रुपयांची मागणी केली. अन्यथा मुलाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याचे गांभीर्य लक्षात येताच आईने सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुरुवारी फिर्याद दाखल केली. या प्रकारामुळे ऑनलाइन फसवणुकीचा नवा फंडा समोर आला आहे. मोबाइल नंबरद्वारे पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला असून, तरुणांनी सोशल मीडियातील अशा प्रकारच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.

सांगलीतील अशा प्रकारची पहिलीच घटना

ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. मात्र, प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन लुबाडणूक करण्याचा हा पहिलाच प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here