म. टा. प्रतिनिधी, : सोशल मीडियातील अकाउंट व्हेरिफिकेशन करून देतो, असे सांगून साताऱ्यातील एका तरुणाने अनेक मराठी कलाकारांना गंडा घातला आहे. कुणाल सतीश हेळकर (वय १९, रा. करंजे पेठ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली असून, तक्रारदार श्रीकांत शिवाजी पाटील (२९, रा. वारणाली, विश्रामबाग) यांनी स्वतःच आरोपी हेळकर याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार श्रीकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हेळकर हा आपण सोशल मीडिया मॅनेजर असल्याचे सांगतो. सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये, यासाठी अकाउंट व्हेरिफिकेशन करून देण्यासाठी तो लोकांकडून पैसे उकळतो. गेल्या वर्षभरात त्याने महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील कलाकार, इव्हेंट मॅनेजर, जाहिरात कंपन्यांमधील काही वरिष्ठांना गंडा घातला आहे. मे २०२० मध्ये त्याने श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. सांगलीत भेट घेऊन त्याने मीडिया अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी पाटील यांच्याकडून १० हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही अकाउंट व्हेरिफिकेशन झाले नसल्याने पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला. अधिक चौकशी केल्यानंतर हेळकरने केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

भामटा हेळकर हा गोव्यात असल्याची माहिती मिळताच पाटील यांनी गुरुवारी गोव्यात जाऊन त्याला ताब्यात घेतले. यानंतर गुरुवारी रात्री उशिरा सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून संशयित हेळकरचा ताबा पोलिसांकडे दिला. हेळकर याच्यावर यापूर्वीही साताऱ्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती फिर्यादी पाटील यांनी दिली. पोलिसांनी सखोल तपास करून फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणावे, अशी अपेक्षा फिर्यादी पाटील यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी संशयिताकडे चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ?

गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादी पाटील यांनी केला आहे. फसवणूक करणाऱ्या संशयिताला समोर हजर केल्यानंतरही पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास उत्सुकता दाखवली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतरच पोलिसांनी फिर्याद घेतली, अशी माहिती पाटील यांनी दिली. हेळकरच्या चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here