मुंबई : राज्यात वाहन उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी ठाकरे सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. भविष्यात वीजेवरील मोटारी (इलेक्ट्रिक कार) हाच पर्याय विकसित होणार असल्याने राज्य सरकारने या क्षेत्रातील बड्या कंपन्यांना राज्यात गुंतवणुकीचे साकडे घातले आहे.

अमेरिकेतील जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाच्या व्यवस्थापनाशी नुकताच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी संवाद साधला. टेस्ला कंपनीने भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीला महाराष्ट्रात जागा देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. ज्यात ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आॅटो हब आणि सरकारच्या धोरणांची माहिती दिली.

येत्या २०२५ पर्यंत देशात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ ५०००० कोटींपर्यंत वाढेल, असा अंदाज अव्हेण्ड्स कॅपिटल या संस्थेने व्यक्त केला आहे. भारतातील इलेक्ट्रिक कारची मागणी पाहता ‘टेस्ला’लासुद्धा भारतीय बाजारपेठ खुणावू लागली आहे. गेल्या महिन्यात टेस्लाचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी एलन मस्क यांनी टेस्ला भारतात २०२१ मध्ये प्रवेश करेल, असे संकेत दिले होते. पुढील वर्षी नक्की भारतात असू, असे मस्क यांनी ट्विट केले होते.

राज्यात शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या धोरणांची सरकार अमलबजावणी करेल. मला वैयक्तिकदृष्ट्या इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि अपारंपरिक ऊर्जा या काळाची गरज वाटतात, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भविष्यात आपले हे विचार मुख्य प्रवाहाची दिशा असतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पुण्यातील चाकण, रांजणगाव येथे औद्योगिक वसाहती असून यात टाटा सारख्या बड्या मोटार उत्पादक कंपन्या आहेत. त्याशिवाय वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या हजारो कंपन्या आहेत. औरंगाबादमध्ये देखील वाहन उद्योग आहे. राज्यात परकी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसून आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here