म. टा. खास प्रतिनिधी,

शिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह कुजेपर्यंत रुग्णालय प्रशासनाच्या कसे लक्षात आले नाही, याबाबतचा तपास रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस करीत आहेत.

प्रशासनाच्या वतीने एक कुजलेला मृतदेह सापडल्याबाबत कळविण्यात आले. या माहितीची शहानिशा करण्यासाठी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्रचंड दुर्गंधी आणि सहज ओळख पटविणे मुश्किल अशी मृतदेहाची अवस्था झाली होती. रुग्णालय प्रशासनाच्या नोंदी आणि इतर सर्व तपासल्यानंतर या व्यक्तीची ओळख पटली. मृत व्यक्ती याच रुग्णालयात उपचार घेत असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. मृतदेह शौचालयात कुजेपर्यंत कुणीच कसा पाहिला नाही, तसेच मृत्यूबाबतच्या इतर सर्व मुद्द्यांवर रुग्णलयाच्या वतीने विभागीय चौकशी करण्यात येत आहे, आमचाही तपास सुरु असल्याचे रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील सोहोनी यांनी सांगितले. तपासात येणाऱ्या तथ्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

मात्र या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या व्यक्तीचा मृतदेह हा रुग्णालयाच्या शौचालयामध्ये आढळून आला. दुर्गंधी येत असल्याची तक्रार आल्यानंतर या शौचालयामध्ये पाहिले असता तेथे हा मृतदेह पडला होता. चार ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून एका २७ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे, ही व्यक्ती तीच आहे का, यासंदर्भात निश्चितपणे सांगता येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

रुग्णालयाच्या शौचालयामध्ये सापडलेला तो मृतदेह कोणाचा आहे यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही, या प्रकरणासंदर्भात चौकशी सुरू आहे, संबंधित विभागातील कर्मचारी, डॉक्टर यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनी ‘मटा’ला सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here