म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोनारूपी रावणाचे दहन होणार आणि सोनेखरेदी जोमात होणार, अशी भावना सर्वच सराफांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण वर्षात एरव्ही होणाऱ्या सोनेखरेदीच्या ६५ टक्के विक्री उद्या, रविवारी दसऱ्याच्या निमित्ताने लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील आणि सोनेखरेदी होईल, अशी आशा या सराफांनी मटाकडे व्यक्त केली.

पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांच्या मते, दसऱ्याला मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी अपेक्षित आहे. हा सण रविवारी येत असल्याने ग्राहकांची संख्या व दागिनेविक्रीत वाढ होईल. आदी बुकिंग केलेले दागिने खरेदी करणेच नव्हे; तर दसऱ्याला नव्या दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी होईल. या दिवशी सोने म्हणून आपट्याच्या पानांना मोठी मागणी असते, जी ज्येष्ठांकडून तरुणांना किंवा मोठ्यांकडून लहानांना दिली जातात. या पानांची खरेदीही सराफांना अपेक्षित आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४९ हजार ते ५२ हजार रुपये या दरम्यान राहील, अशी अपेक्षा आहे.

सर्वच प्रकारच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली आर्थिक उलाढाल होण्यास आता सुरुवात झाली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात या उलाढालीने जोर पकडला आहे. लोक आता सराफांच्या दालनांना भेटी देऊ लागले आहेत. त्यामुळे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सातत्याने सोन्याला वाढती मागणी असेल, असा विश्वास अनमोल ज्वेलर्सचे संस्थापक इशू दतवानी यांनी व्यक्त केला आहे. दसरा व दिवाळीमुळे वर्षातील एका तिमाहीत होते तेवढी विक्री या तिमाहीत होईल. करोनामुळे अनेक लग्ने पुढे ढकलली गेली, त्यातली बहुतांश लग्ने चालू तिमाहीत होत आहेत. त्यामुळे सोन्याची लांबणीवर टाकलेली खरेदी आता होत आहे, असे मत डब्ल्यूबएचपी ज्वेलर्सचे संचालकआदित्य पेठे यांनी व्यक्त केले.

दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण वेगवेगळ्या महिन्यांत येत असल्याने विक्रीत आणखी वाढ होईल. हिऱ्याच्या दागिन्यांना देखील मोठी मागणी दिसून येत आहे. दसरा ते दिवाळी हा काळ पूर्णपणे चैतन्यमय असणार आहे, यात शंका नाही. सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने सराफी व्यवसायाच्या दृष्टीने व्यवसायात मोठी वाढ दिसून येईल अशी प्रतिक्रिया पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांना दिली.

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here