भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील दोन दहशतवादी मौलाना मसूद अझर आणि हाफिज सईद यांच्यावर कारवाई आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत यादीतील चार हजारांहून अधिक दहशतवादी अचानक गायब होणे याचीही नोंद घेण्यात आली आहे. एफएटीएफने दिलेल्या सहा प्रमुख जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरले आहे. काळ्या यादीत समावेश न होता करड्या यादीत स्थान राहणे हीच बाब पाकिस्तानसाठी दिलासादायक ठरली. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळवण्यास पाकिस्तानला अडचणी येणार आहेत. यामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या पाकिस्तानची अवस्था आणखी वाईट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: वाचा:
गेल्या तीन दिवसांत ‘एफएटीएफ’चे पूर्ण डिजिटल सत्र झाले. यामध्ये पाकिस्तानला करड्या यादीतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनीलाँडरिंग आणि दहशतवाद्यांची आर्थिक मदत रोखण्याविरुद्धच्या लढाईतील जागतिक बांधिलकी आणि मानके पूर्ण करण्याबाबत इस्लामाबादच्या कार्यवाहीचे परीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एफएटीएफ’चे अध्यक्ष मार्कस प्लीयर यांनी पॅरिसहून ऑनलाइन पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, ‘पाकिस्तान करड्या यादीतच राहणार आहे.’ दहशतवाद्यांची आर्थिक मदत पूर्णपणे रोखण्यासह एकूण २७ जबाबदाऱ्या पाकिस्तानला दिल्या होत्या. यापैकी २१ जबाबदाऱ्या पाकिस्तानने पूर्ण केल्या आहेत. तर उर्वरित सहा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला आहे. यामुळे पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या करड्या यादीतच राहावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्लीयर पुढे म्हणाले की, पाकिस्तानला दहशवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या लोकांवर निर्बंध आणले पाहिजेत, त्यांच्यावर खटलेही चालवले पाहिजेत. तसेच दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत रोखली पाहिजे.
वाचा:
वाचा:
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेचा ऑपरेशनल कमांडर जाकीऊर रहमान लखवी यांसारख्या संयुक्त राष्ट्रांकडून निर्बंध आणलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. तसेच दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या यादीमधून पाकिस्तानमधील ७,६०० दहशतवाद्यांपैकी चार हजार दहशतवादी मुख्य यादीतून गायब झाले आहेत. याचीही ‘एफएटीएफ’ने नोंद घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये एफएटीएफची बैठक होणार आहे. यात पाकिस्तानच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times