म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

‘देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली आहे. पण आपण हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. राज्यात उद्योगधंदे वाढवून युवकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करू. शेतकरी आणि उद्योजक ही दोन चाके आहेत. ती दोन्ही चाके जपायला हवीत. राज्य अडचणीत असताना मदत द्यायला दुजाभाव करणाऱ्या केंद्र सरकारपुढे आम्ही झुकणार नाही,’ असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

इस्लामपूर येथे नव्याने बांधलेल्या तहसील कार्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, अनिल बाबर, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘निवडणूक काळात कर्जमुक्तीबाबत बोललो होतो. त्यानुसार कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. त्यावरही वाद प्रतिवाद सुरू आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना आणि दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्यांनाही नाराज करणार नाही. कर्जमाफी देणार म्हणजे देणार. संपलेल्या पावसाळ्यात या परिसरात त्सुनामी आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही सरकार होते. त्यांनी मदतीचा हात द्यायला हवा होता. सरकारने पालकत्व स्वीकारायचे असते आणि केंद्रातील सरकारने संपूर्ण देशाचे पालकत्व स्वीकारायचे असते. मात्र केंद्रातील सरकारने दुजाभाव करून मदत द्यायला नकार दिला. चार महिन्यांपूर्वी त्यांच्यासोबतच युती होती. अनेक ठिकाणी आमच्यामुळे त्यांचे खासदार निवडून आले. आम्ही होतो म्हणून केंद्रात सरकार स्थापन झाले हेही त्यांनी विसरू नये. ‘

इस्लामपूर शहरात झालेली ही इमारत तालुक्याचा लौकिक वाढवणारी आहे. इतकी देखणी इमारत संपूर्ण देशात सापडणार नाही. इस्लामपुरातील भाजी मंडई आणि वाहनतळाच्या कामासाठी निधी देऊ, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.

ओरखडे काढू, पण काम करत राहू

‘आमचे सहकारी जयंत पाटील हे अत्यंत हुशार आहेत. ते बोलताना मी लक्षपूर्वक ऐकत असतो. बोलणाऱ्याला वाटते ते आपले कौतुक करताहेत. प्रत्यक्षात त्यांनी काढलेले ओरखडे घरी गेल्यावर लक्षात येतात. ते नेमक्या ठिकाणी ओरखडे काढून ‘कार्यक्रम’ करण्यात निष्णात आहेत. त्यांना आणि मलाही मोठी कौटुंबिक परंपरा आहे. परंपरा विसरून चालणार नाही. जनतेच्या विकासासाठी काम करत राहणे हीच आपली परंपरा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here