रिझर्व्ह बँकेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणि म्हाडा गृहसंकुलात स्वस्त दरात घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आरोपीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने कल्याणातून अटक केली. प्रशांत गणपत बडेकर उर्फ अरविंद सोनटक्के (४२) असे आरोपीचे नाव असून तो कल्याणमधील टावरीपाडा येथील आरटीओ कार्यालयाजवळील संकेश्वर प्रेसिडन्सी इमारतीमध्ये राहत होता. त्याच्याविरोधात महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नंदूरबार आणि मुंबई येथील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. नोकरी आणि घराच्या अमिषाने १२ जणांची ८९ लाख २ हजार ५०० रुपयांची लूट केल्याचे उघड झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या बेबीताई सोळेकर यांना मुंबईतील म्हाडा गृहसंकुलात स्वस्त दरात घर मिळवून देण्याचे सांगून प्रशांत याने विश्वास संपादन केला होता. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावराने त्याने पैसे भरण्यास सांगितले होते. याबरोबरच संदीप साळेकर, पांडुरंग कंक, जगन पवार, मोहन गोळे, गणेश बेलोशे, मारुती शेळके, स्वप्नील रांजणे, नगीना रांजणे, अंकुश गोळे, नितीन गोळे, दिलीप गोळे, मोहन एकनाथ गोळे, मनोज शिंदे, जोत्स्ना गोळे, धनश्री गोळे, लक्ष्मी गोळे अशा १६ जणांची ८९ लाख २ हजार रुपयांची फसवणूक केली होती. रिझर्व्ह बँकेच्या मुंबई शाखेत नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील म्हाडा गृहसंकुलात स्वस्त दरात घर मिळवून देण्याचेही त्याने सांगितले होते. या प्रकरणी साताऱ्यातील शिरवळ, नागपूरच्या राणाप्रताप, नाशिकच्या अंबड, मुंबईच्या समतानगर, पुण्याच्या समर्थ, मावळ आणि चतुश्रुंगी, औरंगाबादच्या कन्टनमेंट आणि नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. खंडणीविरोधी पथकास याची माहिती मिळताच कल्याण येथील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. वेगवेगळ्या मासिक, पुस्तकातून ग्राहकांचे नंबर घेऊन त्यांना संपर्क करून त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times