वृत्तसंस्था, मुंबई : रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांच्या पतपुरवठ्यामध्ये ५.६६ टक्के वाढ होऊन तो १०३.४४ लाख कोटी रुपये झाला आहे. त्याचवेळी बँकांच्या ठेवींमध्ये १०.५५ टक्क्यांची घसघशीत वाढ होऊन या ठेवी १४३.०२ लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत.

वरील आकडेवारीची तुलना ११ ऑक्टोबर २०१९ या दिवशी संपलेल्या पंधरवड्याशी केल्यास त्यावेळी बँकांनी ९७.८९ लाख कोटी रुपये पतपुरवठा केला होता. याच पंधरवड्यात बँकांच्या ठेवी १२९.३८ लाख कोटी रुपयांवर गेल्या होत्या.

यावर्षी २५ सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांचा पतपुरवठा ५.१५ टक्के (१०२.७२ लाख कोटी रुपये) वाढला होता, तर ठेवींमध्ये १०.५१ टक्क्यांची (१४२.६४ लाख कोटी रुपये) वाढ नोंदवली गेली होती.

बँकांकडून केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये झालेली वाढ आणि त्याचवेळी ठेवींमध्येही झालेली वाढ या दोन्ही गोष्टी अर्थव्यवस्थेत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे द्योतक मानले जात आहे. वार्षिक तुलनेनुसार, बँकांच्या बिगरखाद्य पतपुरवठ्यामध्ये ऑगस्ट महिन्यात घट होऊन ती गेल्यावर्षीच्या ९.८ टक्क्यांच्या तुलनेत ६ टक्क्यांवर गेली आहे. त्याचवेळी कृषी व कृषीपूरक उद्योगांसाठी केलेल्या गेलेल्या पतपुरवठ्यामध्ये ४.९ टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात उद्योगांसाठी बँकांनी दिलेल्या पतपुरवठ्यात ३.९ टक्के वाढ नोंदवली गेली होती. मात्र यावर्षी ०.५ टक्के घट नोंदवली गेली आहे. वैयक्तिक कर्जांमध्ये ऑगस्ट महिन्यात १०.६ टक्के वाढ झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here