म. टा. प्रतिनिधी, सांगली: ‘अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच ही मदत संबंधितांना मिळेल. आता केंद्र सरकारची जबाबदारी आहे. बिहारला मदत देण्यात ज्या पद्धतीने तत्परता दाखवली, तशीच तत्परता महाराष्ट्रासाठी दाखवून जबाबदारी पार पाडावी,’ असे आवाहन कृषी राज्यमंत्री यांनी केंद्र सरकारला केले. ते शनिवारी सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या राज्यात सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील पंचनाम्यांचा आढावा घेतल्यानंतर कृषी राज्यमंत्री कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे २५ लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय रस्ते, पूल आणि घरांची पडझड झाली. शेतीच्या नुकसानीचे जवळपास ७० टक्के पंचनामे झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पंचनामे पूर्ण होताच ही मदत संबंधितांना पोहोच होईल. विरोधकांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. तर मग आता केंद्र सरकारची जबाबदारी वाढते. बिहारला ज्या तत्परतेने मदत केली त्याच तत्परतेने केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मदत करावी. आता केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी, असा टोला त्यांनी हाणला आहे.

‘करोना संसर्गाच्या काळातही केंद्र सरकारने राज्याला मदत केली नसल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत राज्य सरकारने आरोग्य सुविधांसाठी खर्च केला. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. केंद्र सरकारने मदत केलीच नाही. याउलट राज्याचा जीएसटीचा परतावा केंद्राने थकवला. भाजपचे नेते रेटून खोटे सांगतात. चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडून माहिती घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here