मुंबईः ‘यंदाच्या या विजयादशमी म्हणजेचं दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत एकजुटीने करोना विषाणूरुपी रावणाचा नाश करुया,’ असा संदेश मुख्यमंत्री यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दिला आहे.

‘विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. करोना संकटावर मात करून नव्या जोमानं भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, लढवय्या महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्यामुळं करोना विषाणूविरोधातल्या लढ्यातही आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकवटलो आहोत. करोनाच्या संकटात निसर्गाचीही अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगमगता आपण सामोरे जात आहोत,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून विषाणुचाच पाठलाग करुन, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धा प्रयत्न करत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांनी खूपच संयम दाखवला आहे. सर्व धर्मीयांनी आपले सण आणि उत्सव घरीच साजरे केले. विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आपण साजरा करणार आहोत. हा सण संकटांवर, वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी सीम्मोलंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो,’ असंही ते म्हणाले आहेत.

‘आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणुच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे गर्दी न करण्याचे-शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रयत्नातूनच आपण कोरोनारुपी रावणाचा नाश करु आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करु,’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here