म.टा. प्रतिनिधी, नगरः ‘राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून सामान्यांच्या हिताची कोणतीही कामे होत नाहीत. मंत्रायलायतून केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम सुरू असून त्यासाठी मेनू कार्ड तयार करण्यात आले आहे,’ असा गंभीर आरोप भाजपचे माजी मंत्री यांनी केला आहे.
विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांचा पाहाणी दौरा केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे असल्याची टीका त्यांनी केली. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या विषयावरून यापूर्वीही राज्य सरकारला टार्गेट केले आहे. आजही त्यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, ‘या सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या कामातच जास्त रस असल्याचे दिसून येते. सामान्यांच्या हिताची कामे सोडून बदल्यांचेच काम मंत्रालयात सुरू आहे. यासाठी मेनू कार्ड तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आजपर्यत झालेल्या अनेक बदल्यांना मॅटने स्थगिती दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आहे त्याच जागी ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. यावरून बदल्या कशापद्धतीने झालेल्या आहेत हे लक्षात येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजसंबंधी विखे पाटील म्हणाले, हे पॅकेज फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिका माहिती आहेत. आपती व्यवस्थापन निधीतून केंद्र सरकार निकषाप्रमाणे मदत करेलच, परंतू केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यापेक्षा राज्य सरकारने दानत दाखवून पूर्वी केलेल्या वक्तव्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती. परंतू फळबागांना २५ हजार आणि इतर पिकांच्या नुकसानीपोटी १० हजार रुपयांची मदत जाहीर करुन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here