निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. या संदर्भातले नवे डेथ वॉरंट दिल्ली हायकोर्टाने जारी केले आहे. या चौघांपैकी एक दोषी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला. शिक्षेला होत असलेल्या विलंबावर निर्भयाची आई आशा देवी यांनी संताप व्यक्त केला होता.
या पार्श्वभूमीवर इंदिरा जयसिंह यांनी एक ट्विट केलं आहे. ‘आशा देवींचं दु:ख आणि वेदना मी समजू शकते. तरीही मी त्यांना सोनिया गांधी यांचं अनुकरण करायला सांगेन. सोनियांनी ज्याप्रमाणं त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनी हिला माफ केलं आणि आपण मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात असल्याचं सांगितलं होतं, तोच कित्ता आशा देवी यांनी गिरवावा,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘आम्ही आशा देवी यांच्या सोबत आहोत, मात्र मृत्युदंडाच्या विरोधात आहोत,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times