महसूलमंत्री यांनी राज्यावर संकटांची मालिकाच सुरू आहे, अशी खंत व्यक्त करून या संकटातही राज्य सरकार नागरिकांना मदत करीत असल्याचे थोरात यांनी सांगितले. थोरात म्हणाले, ‘एक वर्षापूर्वी तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले. सत्तास्थापन मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यामध्ये काळ गेला. मार्चपासून आलेल्या करोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती मंदावली. करोना, निसर्ग चक्रीवादळ विदर्भातील पूर परिस्थिती आणि आता सततचा पाऊस यामुळे संकटा मागून संकट येत आहेत. तरीही लॉकडउनमध्ये उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद असतानाही राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकर्यांसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये अशी दहा हजार कोटींची मदत शेतकरी व सर्वसामान्यांसाठी जाहीर केली आहे.’
त्यानंतर डॉ. तांबे यांनी भाजप सरकारलाही संकट संबोधले. ते म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात जीएसटी, नोटाबंदी यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्यात करोनाचे संकट आले. सध्या देशातील जीडीपी वजा ६ आहे. खरेतर करोना संकटाबरोबर भाजप सरकार हेच देशावर आलेले मोठे संकट आहे. मागील पाच वर्षात एकही विकासाचे काम त्यांनी केले नाही. फक्त धार्मिक भावना भडकावून द्वेषाचे राजकारण वाढवले आहे,’ असा आरोपही डॉ. तांबे यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आता वर्षभरात काय केले, अशी विचारणा आणि त्यावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून मधल्या काळात आलेल्या विविध संकटांकडे बोट दाखविण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times