नवी दिल्लीः माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे ( harish salve ) हे पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. हरीश साळवे हे देशातील नामांकित वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. ६५ वर्षीय साळवे यांनी ३८ वर्षांचा विवाह मोडीत काढत गेल्या महिन्यात पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट देऊन ते वेगळे झाले. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुलीही आहेत. हरीश साळवे २८ ऑक्टोबरला लंडनच्या चर्चमध्ये मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसार्डशी लग्न करणार आहेत. या दोघांचं हे दुसरं लग्न आहे.

साळवे यांनीही धर्म परिवर्तन केलं असून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. साळवे यांचे गेल्या दोन वर्षांपासून कॅरोलीन यांच्याशी संबंध आहेत. उत्तर लंडनमधील चर्चमध्ये ते नियमितपणे जात असतात. साळवे आणि कॅरोलिन या दोघांचं हे दुसरं लग्न आहे. या दोघांनाही आधीच्या लग्नांपासून मुले आहेत. कॅरोलिन या ५६ वर्षांच्या असून त्या व्यवसायाने एक कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलिनशी भेट झाली. या दोघांमधील भेटी हळूहळू वाढल्या आणि नंतर घट्ट मैत्री झाली.

घटस्फोटानंतर साळवे हे मुलांपासून दूर लंडनमध्ये कॅरोलीन सोबत रहात आहेत. दोघांमधील समंजसपणाने त्यांचे संबंध पुढे गेल आणि आता सोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आणि हरीश साळवे हे दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत. दोघांनीही महाराष्ट्रातील नागपूर शहरात शिक्षण घेतलं. १९७६ मध्ये साळवे दिल्लीला आले आणि बोबडे मुंबई उच्च न्यायालयात आले. नंतर बोबडे हे हायकोर्टाचे न्यायाधीश आणि साळवे वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले.

हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच त्यांच्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील आहेत. यामुळेच त्यांना भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले होते. कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये साळवे यांनी भारत सरकारची भक्कम बाजू मांडून देशाला गौरव वाढवला आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विनंतीवरून त्यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क घेतलं होतं.

देशातील आघाडीचे उद्योगपती आणि व्होडाफोन, रिलायन्स, मुकेश अंबानी, रतन टाटा यांचेही खटले साळवे यांनी लढले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here