वृत्तसंस्था, नवी दिल्ली : फ्युचर समूहाचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायाला स्वतःचा रिटेल व्यवसाय विकण्याचा मनसुबा रविवारी उधळला गेला. फ्युचर आणि अॅमेझॉन यांच्यात फ्युचर रिटेलबाबत झालेला करार बाजूला ठेवत प्युचर समूहाने रिलायन्सला आपला रिटेल व्यवसाय विकण्याचा घाट घातला होता. याला सिंगापूर येथील एक सदस्यीय लवादाने तीव्र आक्षेप घेत हा व्यवहार तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे अॅमेझॉनला मोठाच दिलासा मिळाला आहे.

अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने लवादाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. फ्युचर समूहाने व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकमार असल्याची घोषणा २९ ऑगस्ट रोजी केली होती. याद्वारे फ्युचरच्या रिटेल, होलसेल व मालहाताळणी उद्योगाची मालकी व्हेन्चर्स लिमिटेडची होणार होती. मात्र गेल्यावर्षी अॅमेझॉनने फ्युचर समूहाच्या शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या फ्युचर कुपन्स लिमिटेड या कंपनीतील ४९ टक्के हिस्सा खरेदी केला होता. फ्युचर कुपन्सचा फ्युचर रिटेलमध्ये ७.३ टक्के हिस्सा आहे. त्यावेळी हा फ्युचर समूहाचा महत्त्वाकांक्षी व्यवसाय तीन ते १० वर्षांत खरेदी करण्याचा करार अॅमेझॉनने फ्युचर समूहाबरोबर केला होता.

हा करार बाजूला ठेवत, फ्युचर समूहाने आपला वरील व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकत असल्याचे जाहीर केल्यानंतर अॅमेझॉनने लवादाकडे याविरोधात दाद मागितली होती. अॅमेझॉनची बाजू गोपाल सुब्रमणियम, गौरब बॅनर्जी, अमित सिबल व अल्विन येओ यांनी मांडली. याआधी व्ही. के. राजा या एकसदस्यीय लवाद न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांची बाजू १६ ऑक्टोबर रोजी ऐकून घेतली होती.

फ्युचर समूहाने २४,७१३ कोटी रुपयांना आपला रिटेल व्यवसाय रिलायन्सला विकणे याचा अर्थ अॅमेझॉनबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन असल्याचा दावा अॅमेझॉनने यावेळी केला होता. यावेळी फ्युचर समूहाची बाजू अॅड. हरीश साळवे यांनी मांडली. व्ही. के. राजा यांनी दोन्ही पक्षांचे दावे ऐकून घेऊन अखेर फ्युचर – रिलायन्स व्यवहार तूर्तास स्थगित ठेवण्याचा आदेश दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here