मुंबई : दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा पुन्हा एकदा मनसेत प्रवेश करणार आहेत. सुरुवातीला मनसेत असलेले प्रकाश महाजन यांना २००९ ला मनसेतून निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पण २०११ ला त्यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपण मनसेत जाणार असल्याचं जाहीर केलं.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रकाश महाजन यांची शिवसेना उपनेता आणि प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण दोन वर्षातच त्यांनी शिवसेना सोडली. कृष्णकुंजवर प्रकाश महाजन आणि शिवसेनेचे माजी आमदार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. दोघेही मनसेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. कारण, यापूर्वी हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या तिकिटावरच आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मनसेचं महाअधिवेशन

मनसे पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत २३ जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत आहे. यावेळी राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या झेंड्यात सध्या निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा हे रंग असून मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असेल, तर मध्यभागी ‘शिवराजमुद्रा’ असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे वाटचाल असल्याचं बोललं जात आहे.

प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव यांची
‘राज’ भेट

पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रकाश महाजन यांनी अनेकदा भूमिका मांडली आहे. त्यामुळे प्रकाश महाजन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे नाहीत. याशिवाय हर्षवर्धन जाधव हे नावही राजकारणात चांगलंच परिचित आहे. भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. परिणामी मतांचं विभाजन होऊन औरंगाबादेत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. आता हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे मनसेचं मराठवाड्याकडेही विशेष लक्ष असल्याचे संकेत मिळत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here