अहमदनगर: तालुक्यात बिबट्यांचा वावर आणि उपद्रवही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अंगणात आजोबांसोबत जेवण करणाऱ्या चिमुकलीला उचलून नेल्यानंतर आता आजोबांच्या कुशीत झोपलेल्या चिमुरड्याला बिबट्याने उचलून नेले आहे. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ तर व्यक्त होत आहेच, मात्र ग्रामस्थांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत संतापही व्यक्त केला आहे.

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडीजवळील केळवंडी शिवारात ही घटना घडली. बिबट्याने सक्षम गणेश आठरे (वय ८) याला आजोबांच्या कुशीतून उचलून नेऊन ठार केले. सकाळी त्याचा मृतदेह घराजवळच शेतात अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. गणेश आठरे एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरीला आहेत. पाथर्डी ते माणिकदौंडी रस्त्यावर केळवंडी येथे गावाबाहेर त्यांची वस्ती आहे. रात्री ते कुटुंबासह घरात झोपले होते. त्यांचा मुलगा सक्षम याला त्रास होऊ लागला. त्यामुळे उलट्या करण्यासाठी तो घराबाहेर आला. त्यानंतर बाहेरच पडवीत झोपलेल्या आजोबांजवळ तोही झोपला. काही वेळानंतर त्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने आजोबा जागे झाले. तोपर्यंत बिबट्या त्याला घेऊन पसार झाला होता. आसपासाच्या लोकांना बोलाविण्यात आले. त्यांच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र, काहीच हाती लागले नाही. सकाळी सक्षमचा अर्धवट मृतदेह घरापासून काही अंतरावर आढळून आला.

वाचा:

वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला. शिट्या वाजवत आवाज करण्यात आला. त्यामुळे शेतात लपून बसलेला बिबट्या बाहेर आला आणि डोंगराच्या दिशेने पळून गेला. या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येत आहे. त्याला पकडले जाईल मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तालुक्याचे वन अधिकारी शिरीष निरभवने यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील मढी येथे एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला होता. आजोबांसोबत अंगणात जेवण करीत असताना बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे शेळ्या आणि पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केला आहे. काही शेतकरी हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर आणि उपद्रव वाढला असल्याचे दिसून येते. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here