मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेट्टी हे आज सकाळी त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर मारेकर्यांनी तीन गोळ्या घातल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यांच्या डोक्यात दोन व छातीत गोळी लागली असून, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल शेट्टी यांना तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. लोणावळ्यातील जयचंद चौकात ही घटना घडल्याने लोणावळा शहर संपूर्णपणे हादरले आहे. ३० ते ३५ वर्षांपूर्वी राहुल शेट्टी यांचे वडील उमेश शेट्टी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज राहुल यांची निर्घृण हत्या झाली. राहुल यांच्या पश्चात शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, आई मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्या मार्गाने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. राहुल यांना आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे संकेत मिळाल्यावर राहुल शेट्टी यांनी यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली होती.
दुसरी घटना रविवारी दसऱ्याच्या रात्री दहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे घडली. या घटनेत गणेश नायडू या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असून, या घटनेत खुनी हल्ला करणाराही गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा एक हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी हल्लेखोरावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांचा लोणावळा शहर पोलीस तपास करत आरोपींचा शोध घेत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times