सुशांतसिंह राजपूत आत्महत्येच्या प्रकरणात मुंबई शहर, मुंबई पोलीस, शिवसेना व आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात कंगना राणावत आघाडीवर होती. मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करण्यापर्यंत तिची मजल गेली होती. उद्धव ठाकरे यांनी कंगनाच्या टीकेला कालच्या दसरा मेळाव्यात जोरदार उत्तर दिलं. कंगनाला ‘नमकहराम’ म्हणून हिणवलं होतं. आपल्या राज्यात खायला मिळत नाही म्हणून मुंबईत येतात आणि नमकहरामी करतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. कंगनानं आज मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उत्तर दिलं.
वाचा:
‘उद्धव ठाकरे देशात फूट पाडत आहेत. मुंबईनं आश्रय दिला नसता तर माझ्या राज्यात मला खायला मिळालं नसतं असं ते म्हणतात. त्यांना हे बोलताना लाज वाटली पाहिजे. शिवशंकर व देवी पार्वतीशी नातं सांगणाऱ्या व पांडवांनी आश्रय घेतलेल्या हिमाचलबदद्ल उद्धव ठाकरे यांचं मत इतकं क्षुद्र आणि खुनशी असेल असं वाटलं नव्हतं. हिमाचल ही एक देवभूमी आहे. अनेक मंदिरं तिथं आहेत. सफरचंद, किवी, डाळींब व स्ट्रॉबेरीचं उत्पादन तिथं घेतलं जातं,’ असं तिनं म्हटलं आहे.
हिमाचलच्या समृद्धीचं वर्णन करताना तिथं गुन्हेगारी शून्य आहे, असं कंगनाला म्हणायचं होतं. मात्र, तिनं हिमाचलमध्ये ‘झिरो क्राइम रेट नाही’ अशा अर्थाचं वाक्य लिहिलं. त्यावरून ती ट्रोल होऊ लागली. ही चूक लक्षात येताच तिनं नवीन ट्वीट केलं. ‘मुख्यमंत्र्यांच्या जाहीर भाषणामुळं मी इतकी विचलित झाले होते की त्यांना उत्तर देताना माझ्या ट्वीटमध्ये चूक झाली. हिमाचलमध्ये गुन्हेगारी नाही असं मला म्हणायचं होतं. आमच्याकडं गरीब आणि खूप श्रीमंत लोक नाहीत. निष्पाप व परोपकारी लोकांची ती धार्मिक भूमी आहे,’ असा खुलासा तिनं पुढील ट्वीटमध्ये केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times