इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भोरे हे सतत तक्रार करत असतात. येथील भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून त्यांचा गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी एका घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना भोरे यांनी नगरपालिकेच्या ठेकेदाराला अडवले. जनावरे पकडण्याच्या ठेका दिलेल्या या ठेकेदाराबरोबर त्यांचा वाद झाला. मृत जनावर ओढत नेण्याऐवजी घंटागाडीत टाकून घेऊन जा, अशी विनंती त्यांनी त्या ठेकेदाराला केली. पण, त्याला नकार देत ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी भोरे यांनाच शिवीगाळ केली. धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
यानंतर भोरे याने इचलकरंजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार केली. पण, अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. शनिवारी भोरे यांनी बैठक घेऊन सोमवारपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास करण्याचा इशारा दिला होता. सोमवारी ११ वाजेपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या भोरे यांनी नगरपालिकेच्या दारातच स्वतःला पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेने कर्मचारीही भांबावून गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत ते पन्नास टक्के पेक्षा अधिक होरपळले होते. त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. नगरपालिकेच्या दारातच घडलेल्या या घटनेने इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times