म. टा. प्रतिनिधी, जळगावः
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानतंर माजी मंत्री आज सोमवारी त्यांच्या जळगावातील निवासस्थानी मुक्ताई बंगल्यावर आले होते. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसोबत खडसेंची भेट घेतली. या भेटीत खडसे आणि पाडवी यांच्यात नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समिकरणांवर बंदद्वार खलबते झाली. एकंदरच खडसेंनी खान्दशातील व्यूव्हरचेनासाठी आखणी सुरु केली आहे.

खडसे सोमवारी जळगावात दाखल झाल्यानंतर तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहादा शहरप्रमुख सुरेंद्र कुंवर, शहाद्याचे नगरसेवक इकबाल शेख, चंद्रकांत पाटील, बी. के. पाडवी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राजेंद्र वाघ, राजरत्न बिरारे, रोहित ढोडरे आदींच्या शिष्टमंडळाने खडसेंची भेट घेतली. राजकीय चर्चेच्या अनुषंगाने ही भेट बंदद्वार झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तसेच शहादा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत प्राथमिक चर्चा झाली. त्याचप्रमाणे खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्यासोबत भाजप तसेच इतर पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असलेल्या बड्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नावांवर चर्चा झाली. बैठक आटोपून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना खुद्द माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी याबाबत दुजोरा दिला.

खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. अनेक बडे राजकीय नेते व पदाधिकारी राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. परंतु, आताच त्यांची नावे जाहीर करता येणार नाहीत. आता चाचपणी सुरू आहे. वेळ आल्यावर सर्वांची नावे जाहीर केली जातील. लवकरच नंदुरबार जिल्हा हा राष्ट्रवादीमय होईल, असे सांगत माजी आमदार पाडवींनी उत्सुकता ताणून धरली. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व शहादा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील आमची खडसेंसोबत चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, चर्चेचा तपशील आता सांगता येणार नाही, असेही पाडवी म्हणाले.

जळगाव जिल्हा परिषदेचे भाजपचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हेदेखील सोमवारी दुपारी खडसे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी खडसेंसोबत बंदद्वार चर्चा देखील केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here