म.टा. प्रतिनिधी, नगरः ‘ यांना भाजपमध्येच खूप पश्चाताप झाला, म्हणूनच ते आमच्याकडे आले,’ असा टोला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना लगावला आहे. ‘आमच्या पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवला जातो, हे त्यांना लवकरच कळेल,’ असेही ते म्हणाले.

‘खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्ये जी किंमत होती, ती कधीही राष्ट्रवादीत मिळणार नाही. आगामी काळात खडसे यांना राष्ट्रवादीत गेल्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा घणाघात माजी मंत्री प्रा. शिंदे यांनी केला होता. शिंदे यांच्या या वक्तव्याचा तनपुरे यांनी चांगला समाचार घेतला आहे. ते आज नगरमध्ये बोलत होते. ‘खडसे यांना भाजपमध्येच खूप पश्चाताप झाला, म्हणून ते आमच्याकडे आले आहेत, आणि आमच्या पक्षात सर्वांना योग्य तो सन्मान ठेवला जातो. हे त्यांना नक्की कळेल,’ असा टोला तनपुरे यांनी लगावला.

खडसे यांच्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील कोणी मोठा नेता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे का? असे तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘तसं पाहिलं तर मी पक्षात छोटा कार्यकर्ता आहे. मात्र नगरमधील काहीजण संपर्कात आहेत. वेळ आल्यावर आपल्याला कळेल.’

दरम्यान, नगर जिल्ह्यातील कोणीही खडसे यांच्या संपर्कात नसल्याचा दावा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रा.शिंदे यांनी केला होता. मात्र तनपुरे यांनी जिल्ह्यातील काहीजण संपर्कात असून वेळ आल्यावर कळेल, असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

तिजोरीची बिकट अवस्था असतानाही शेतकऱ्यांना मदत केली
‘राज्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सरकारच्या तिजोरीचे करोनामुळे अवस्था बिकट झाली आहे. केंद्र सरकारकडून कुठलीही मदत मिळाली नाही. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठे पॅकेज दिले असून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल,’ असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. ‘राज्यातील करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,’ असेही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here