पुणे: आपल्या मातीतील खेळ मल्लखांब अमेरिकेत लोकप्रिय करण्यासाठी पुणेकर चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर हे पती-पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून घेतली. यामुळे अमेरिकेत राहणारे चिन्मय-प्रज्ञा यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

चिन्मय आणि प्रज्ञा या दोघांना लहानपणापासूनच मल्लखांबची आवड होती. चिन्मय (वय ४२) हे पुण्यातील रमणबाग, एस. पी. कॉलेज आणि भारती विद्यापीठात शिकले आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे. बाळकृष्ण थत्ते यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. २००३मध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी प्रज्ञा (वय ३८) यादेखील मल्लखांबमध्ये अनेक स्पर्धा खेळलेल्या. त्या मॉडर्न कॉलेजच्या विद्यार्थिनी. २००३मध्ये चिन्मय यांनी मल्लखांब खेळणे सोडले आणि ते प्रशिक्षणाकडे वळले. पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. यानंतर नोकरीनिमित्त ते अमेरिकेत स्थायिक झाले. ते बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिसेसमध्ये प्रोग्राम मॅनेजर आहेत. २००९ पासून ते अमेरिकेत आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील ७० जणांना ते मल्लखांबचे प्रशिक्षण देत आहेत.

आमचा संघ मल्लखांबचा प्रचार-प्रसार करण्याचे काम करीत आहे. या खेळाचे महत्त्व सगळ्यांनाच ठाऊक आहे. अमेरिकेत हा खेळ आता युवकांना आकर्षित करीत आहे. मात्र, पंतप्रधानांनीच आमच्या कार्याची दखल घेतल्यावर नवा हुरूप आम्हाला मिळाला आहे. ही कौतुकाची थाप नक्कीच प्रोत्साहन देणारी आहे.
– चिन्मय पाटणकर

अमेरिकेत जेव्हा मल्लखांबची सुरुवात केली, तेव्हा उद्देश केवळ या खेळाची आवड जोपासणे आणि खेळाचा जमेल तेवढा प्रसार करणे एवढाच होता. हळूहळू खेळाडूंची संख्या वाढत गेली. आता आम्ही जागतिक स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करीत आहोत. पंतप्रधान मोदींनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत केला आहे.
– प्रज्ञा पाटणकर

आपल्या अनेक खेळांनी जगाला आकर्षित केले आहे. त्यापैकी एक खेळ म्हणजे मल्लखांब. मल्लखांब अनेक देशांत लोकप्रिय होत आहे. अमेरिकेत चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकरने घरून मल्लखांब शिकवायला सुरुवात केली. अमेरिकेत आता मल्लखांबचे अनेक ट्रेनिंग सेंटर सुरू झाले आहेत. अमेरिकेतील अनेक युवा खेळाडू मल्लखांब शिकत आहेत. मलेशिया, पोलंड, जर्मन यांसारख्या २० देशांत मल्लखांबला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याची आता वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धाही होणार आहे. कदाचित आताच्या पिढीला मल्लखांबबाबत फारसे माहिती नसेल. पण तुम्ही याची माहिती इंटरनेटवरून घेऊ शकतात, बघू शकतात.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान (रविवारच्या ‘मन की बात’मध्ये)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here