म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेली तीन टक्के सूट, त्यावर विकासकांनी दिलेल्या सवलती, अनधिकृत चाळी-झोपडपट्ट्यांमधून अधिकृत घरांमध्ये स्थलांतरित होण्याची नागरिकांची मानसिकता या सर्वांच्या एकत्रित परिणामाने गेले सात महिने करोना संकटामुळे ठप्प असलेले रिअल इस्टेट क्षेत्र सावरले असून विजयादशमीच्या मुहुर्तावर परिसरात दोन हजारांहून अधिक नव्या घरांची नोंदणी झाल्याने आणि विकासकांना दिलासा मिळाला आहे.

गेली काही वर्षे बांधकाम व्यवसायात मंदी आहे. पाच वर्षांहून अधिक काळ किमती स्थिर असल्याने गुंतवणूक म्हणून होणारी घरांची खरेदी जवळपास बंद आहे. करोना संकटानंतर तर गुंतवणुकीचे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे विकासक चिंतेत होते. मात्र विजयादशमीच्या निमित्ताने ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी राहत्या घराव्यतिरिक्त शहरात अथवा अन्यत्र दुसरे घर घेण्याची ग्राहकांची मानसिकता होती. मात्र घरांच्या किंमती स्थिर झाल्यानंतर हा ट्रेंड मागे पडला. आता आहे ते घर विकून अधिक प्रशस्त, सुखसोयीयुक्त घरांमध्ये स्थलांतरित होण्याचा ग्राहकांचा कल आहे. ‘करोना’नंतर ‘रिअल इस्टेट’चे क्षेत्र पुन्हा रुळांवर येण्यास हे ग्राहक मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे ढोबळ मानाने दिसते. वर्षानुवर्षे झोपडपट्टीत राहणारी कनिष्ठवर्गीय कुटुंबे शहरातील अशी जुनी, अधिकृत घरे विकत घेण्यास उत्सुक असतात. कुटुंब विस्तारामुळे राहती सदनिका अपुरी पडत असल्याने ती विकून मोठ्या घरात जाणारेही बरेचजण आहेत.

करोना संकट काळात गृह विलगीकरणासाठी मोठी घरे उपयोगी पडली. त्यामुळे आता किमान दोन शयनकक्ष असणाऱ्या घरांची मागणी वाढली आहे. आधीचे घर विकून मिळणारी रक्कम भरून मोठे घर घेतले जाते. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा भागात ग्राहक आता मोठ्या घरांना पसंती देऊ लागले आहेत.

टॉवर संस्कृतीचे सीमोल्लंघन

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरांपुरत्या मर्यादित असलेल्या टॉवर संस्कृतीने आता डोंबिवली, अंबरनाथ शहरांमध्ये सीमोल्लंघन केले आहे. ठाणे-डोंबिवली शहरांच्या वेशीवरील टाऊनशिपमध्ये यापूर्वीच टॉवर्स आहेत. मात्र आता ही टॉवर संस्कृती वाढू लागली आहे. डोंबिवलीत कल्याण-शीळ मार्गालगत वीस मजल्यांहून अधिक उंच इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. अंबरनाथमध्येही एका २४ मजली इमारतीचे काम सध्या सुरू आहे.

गेल्या आठवड्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये दररोज सरासरी तीनशे ते साडेतीनशे सदनिकांची नोंदणी झाली. त्यामुळे दसऱ्याच्या मुहुर्तावर दोन हजारांहून अधिक घरांची विक्री झाली असे म्हणता येईल. बांधकाम व्यावसायिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

मोहित भोईर, एमसीएचआय, कल्याण-डोंबिवली.

लोकल ट्रेन नसल्याचा फटका

सर्वसाधारणपणे मुंबईतील ग्राहक उपनगरी रेल्वेने अंबरनाथ-बदलापूर परिसरात घरे पाहण्यासाठी येतात. यंदा ट्रेन नसल्याने ग्राहकांची संख्या रोडावली असल्याचे बदलापूर येथील एका बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. तरीही मुंबई महानगर प्रदेशात सर्वांत किफायतशीर दरातील घरे याच भागात असल्याने येथील बांधकाम व्यवसाय तरेल, असा विश्वास विकासकांना वाटत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here