म. टा. वृत्तसेवा, डहाणू

जिल्ह्यात आणि बालमृत्यूची समस्या अजूनही सुटलेली नाही. मागील सहा वर्षांत जिल्ह्यात ३००३ झाल्याचे समोर आले आहे. प्रतिदिन एक या प्रमाणे महिन्याला सुमारे ४० आणि वर्षाकाठी ५०० असे हे प्रमाण आहे. यामध्ये सर्वाधिक बालमृत्यू जव्हार व डहाणू तालुक्यांतील आहेत.

पालघर जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. २०२०च्या एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १४० बालमृत्यू झाले. गतवर्षी या काळात ही आकडेवारी १३१ होती. यंदा बालमृत्यूच्या संख्येत नऊने वाढ झाली आहे. ठाणे जिल्हा विभाजन झाल्यानंतर २०१४-१५मध्ये पालघर जिल्हा अस्तित्वात आला. त्यावर्षी जिल्ह्यात ६२६ बालमृत्यू झाले होते. ही मोठी आकडेवारी लक्षात घेत सरकारच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात कुपोषण निर्मूलन, माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. मात्र फारशी घट झालेली दिसून येत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू ग्रामीण भागात आहेत. कुपोषण, कमी दिवसांत जन्मलेले बाळ, कमी वजनाचे बाळ, इतर आजार, अपघात, श्वासोच्छ्वास कोंडणे, अशा विविध कारणांनी सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचा मृत्यू झालेला आहे. यातील बहुतांश बालमृत्यू जव्हार व डहाणू तालुक्यांत झाले आहेत. जव्हार तालुक्यात गेल्या सहा वर्षांत ८२५, तर डहाणू तालुक्यात ६८० बालमृत्यू झाले. जून ते सप्टेंबर काळात हे प्रमाण अधिक आहे.

बालमृत्यूची कारणे
पालघर हा आदिवासीबहुल भाग आहे. पावसाळ्यात या दुर्गम भागात पोहचणे सरकारी यंत्रणेला सहज पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे जून ते सप्टेंबर या काळात बालमृत्यूचे प्रमाण वाढते. येथे रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने पालकांकडून बालकाला पुरेसा वेळ देता येत नाही. आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नजीकच्या गुजरात राज्याचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो. महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या योग्य अंमलबजावणीचा अभाव आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीचाही अभाव आहे. त्यामुळेच बाळ आजारी असल्यास पालकांना तत्काळ लक्षणे समजून येत नाहीत. आजार बळावून बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. करोना काळाचा फटकाही बसलेला आहे.

करोना फटका
करोनामुळे शाळा, अंगणवड्या, बंद असून बालकांच्यासाठीचा कार्यक्रम मंदावला आहे. आरोग्य तसपासणी सुरू करायची आहे. मुदतीपूर्व प्रसूती व कमी वजनाच्या बाळांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. गर्भवती माता तपासणी, रक्तदाब यांची दक्षता घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. योग्य आहार मिळणे तसेच गर्भवतींना तपासणीसाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. सुदृढ माता असल्यास सुदृढ बालक जन्माला येते. रोजगारासाठी स्थलांतर होते. त्यामध्ये बालक व मातांची तपासणी होणे गरजेचे आहे. दोघांनाही पुढे आजार होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस, एएनएम या सर्वांचा समन्वय राहिला पाहिजे, तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, सीएचओ यांनी एकत्रित या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने चार दिवसांपूर्वीच अशी बैठक घेण्यात आली. बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आपण नुकताच पदभार स्वीकारला असून जिल्ह्यातील या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी सांगितले.

सहा वर्षांत झालेले एकूण बालमृत्यू
(२०१४-२०२० ऑगस्टपर्यंत)

मोखाडा २७४

जव्हार ८२५

विक्रमगड २८५

वाडा ३०१

पालघर ३४३

तलासरी १९२

डहाणू ६८०

वसई १०३

एकूण ३००३

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here