मॅनहोलमध्ये मानवी मैला काढण्यासाठी अनेक भागांत माणसाला गटारात उतरवला जातो. हे काम करणाऱ्या व्यक्तींचा विविध आजारांना सामोरे जावे लागते, त्यांचे आयुष्यही घटते. अनेकदा मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू ओढवतो.
हे काम करणाऱ्या व्यक्तींच्या यातनांबाबतचे वृत्त वाचून केरळमधील राशीद के. या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचे मन हेलावले. यावर तंत्रज्ञानाच्या साह्याने तोडगा काढण्याचा पण त्याने केला आणि हा मैला उचलण्यासाठी एका रोबोची निर्मिती केली. या रोबोला यांत्रिक हात बसवले असून तो एखाद्या माणसाप्रमाणेच हा मैला स्वच्छ करू शकतो.
त्याचा हा प्रयोग आवडल्याने केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रायोगिक स्तरावर हे रोबो वापरण्यास सुरुवात केली. यानंतर देशातील विविध ठिकाणी या रोबोचा वापर करण्यास सुरुवात केली. आज देशात अशा प्रकारचे ४० रोबो कार्यरत आहेत. या रोबोंची अत्याधुनिक आवृत्तीही दाखल झाली असून लवकरच आणखी पाच रोबो कार्यरत होणार असल्याचे राशीदने सांगितले. मॅनहोलचे नाव बदलून रोबोहोल म्हणून ओळखले जावे असा आमचा प्रयत्न आहे, असेही राशीद सांगतो.
या संशोधनाला अंजली माशेलकर स्मृती पुरस्कार तसेच मेरिको इनोव्हेशन फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेरिको इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील संशोधनांना सन्मानित करण्यात येते.
सरकारकडून लवकरच निर्णय
या प्रकल्पाबाबत संसदेच्या विशेष समितीमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी देशात एकही माणूस मॅनहोलमध्ये उतरवणार नाही, यासाठी यंत्रणा सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे राज्यसभा खासदार आणि हा विषय केंद्र सरकारपर्यंत पोहचवणारे यांनी सांगितले. या चर्चेत सामाजिक न्यायमंत्री ताराचंद गहलोत यांनी या विचारास अनुकूलता दर्शविली. यानंतर हा विषय केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यापर्यंत गेला. त्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शविली असून स्मार्ट सिटीपासून याचा वापर करण्याचा विचार त्यांनी माडला आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल, असे साबळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
कौतुकाची थाप
राशीद याचे हे संशोधन उल्लेखनीय आहे. यामुळे देशातील एका घटकाला मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. यांनी व्यक्त केली. या संशोधनामुळे कोणाचाही रोजगार जाणार नाही. सध्या हे काम करणाऱ्यांनाच रोबो चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे त्यांचे जीवनमान आणि सामाजिक स्थान उंचावण्यासही मदत होईल, असा विश्वास डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times