रामदास आठवले यांनी काल लक्षण जाणवत असल्यानं करोनाची चाचणी करून घेतली होती. आज त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोनाची सौम्य लक्षणं जाणवत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच, आठवले यांच्या संपर्कात आलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही करोनाची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
काल रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोषला रिपाइं पक्षात प्रवेश दिला होता. त्यावेळी रामदास आठवले तिथं उपस्थित होते. तसंच, पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होती. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाकडून आठवलेंच्या संपर्कात असलेले व लक्षण जाणवत असणाऱ्यांना करोनाची चाचणी करून घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यात करोनाचा संसर्गा वाढत असताना व लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघात प्रत्यक्ष कामं केली होती. तसंच, आठवलेंनी हाथरस प्रकरणी पिडीतेच्या कुटुंबीयांची भेटही घेतली होती. त्याचबरोबर, राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागांत जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणीही केली होती. त्यामुळं आठवले यांना नेमका कधी आणि कसा संसर्ग झाला याबाबत अद्याप काही माहिती देण्यात आली नाहीये.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times