मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच शबाना यांना कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात (एमजीएम) दाखल करण्यात आले आहे. शबाना यांच्यासोबत कारमध्ये त्यांचे पती व गीतकार जावेद अख्तरही होते. मात्र अपघातात त्यांना कोणताही इजा झालेली नाही, असे सांगण्यात आले. शबाना यांच्या कारची ट्रकवर मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
पुण्याहून मुंबईकडे येताना अपघात
रायगड पोलिसांनी अपघाताबाबत माहिती दिली आहे. अपघातात शबाना यांच्यासह त्यांच्या कारचे चालकही जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. शबाना व कारचालकाला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अधिक उपचारासाठी शबाना यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
सेलिब्रेशननंतर अपघाताचा आघात
शबाना यांचे पती जावेद अख्तर यांचा ७५ वा वाढदिवस १७ जानेवारी म्हणजे कालच साजरा करण्यात आला. हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. यानिमित्त १६ आणि १७ जानेवारी अशा दोन पार्टी आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिली पार्टी रेट्रो थीमवर होती तर दुसरी पार्टी ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या पार्टींत बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. या जंगी सेलिब्रेशननंतर दुसऱ्याच दिवशी अख्तर कुटुंबावर अपघाताचा आघात झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times