म. टा. प्रतिनिधी, सांगली: तालुक्यातील खटकाळे येथे वाळूची चोरी रोखण्यासाठी गेलेले मंडल अधिकारी आणि तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत मंडल अधिकारी पांडुरंग रघुनाथ कोळी (वय ५४, रा. आटपाडी, जि. ) यांच्यासह खटकाळे येथील तलाठी जखमी झाले आहेत. हा प्रकार सोमवारी (ता. २६) रात्री उशिरा घडला. याबाबत उदय देशमुख आणि गंड्या देशमुख (दोघेही रा. खटकाळे) यांच्यासह अनोळखी ट्रॅक्टर चालकावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आटपाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटकाळे येथील माणगंगा नदीच्या काठावरून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. त्यांनी या घटनेची माहिती मंडल अधिकारी पांडुरंग कोळी यांना देऊन कारवाई करण्याची सूचना दिली. यानुसार मंडल अधिकारी कोळी हे खटांगळे येथील तलाठ्यांना सोबत घेऊन कारवाईसाठी गेले. सोमवारी रात्री खटांगळे येथील नदी पात्राजवळ गेल्यानंतर त्यांना वाळूने भरलेली ट्रॉली आणि ट्रॅक्टर चिखलात अडकलेला दिसला. अधिकाऱ्यांना पाहताच ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. यानंतर सुमारे अर्ध्या तासाने उदय देशमुख हा ट्रॅक्टरमालक घटनास्थळी पोहोचला.

अधिकाऱ्यांनी त्याला तहसीलदार कार्यालयात ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, त्याने अधिकाऱ्यांनाच दमदाटी केली. ट्रॅक्टरला आडवे आल्यास याद राखा, असे म्हणत त्याने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वतःचा जीव वाचवताना मंडल अधिकारी आणि तलाठी रस्त्यावर पडून जखमी झाले. यानंतर काही वेळाने आलेला गंड्या देशमुख याने दुचाकी अंगावर घालून अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर जप्त केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत मंडल अधिकारी कोळी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वाळू तस्करांच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी उदय देशमुख, गंड्या देशमुख आणि अनोळखी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आटपाडी, कवठेमहांकाळ परिसरात वाळूची तस्करी वाढली असून, वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here