या प्रकरणात ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरिक्षक विवेक जाधव यांना अवैधरित्या शस्त्रे घेऊन काही गुन्हेगार जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी (२६ ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि फुलंब्री पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी फुलंब्री येथील खुलताबाद टी पॉईंट येथे नाकाबंदी केली. त्यावेळी एक भरधाव कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. कारमधील ५ जणांना खाली उतरविले. पोलिसांनी या ५ जणांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी या पाचही जणांची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे ३ पिस्तुल आणि १३ जीवंत काडतुसे सापडली. ती जप्त करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी संतोष ओंकार गायकवाड (रा. बीड), नितीन दत्तायत्र जाधव (रा. गवेराई, बीड), शरद सुरेश पुरी (२७, (रा. बीड), राहुल पुंडलिक बुधनव (२२, रा. खामगाव, बीड), मच्छिंद्र ज्ञानदेव सानप (२६, रा. सावरगाव, बीड) यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस उपनिरिक्षक विवेक जाधव, फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सम्राटसिंग राजपुत, उपनिरिक्षक डी. आर. वाघमारे, आर एम मुऱ्हाडे, बी. आर. कांबळे, पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार एस. के. दौड, बाबासाहेब नवले, वाय. बी. तरमाळे यांनी केली.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
नितीन जाधव याच्यावर चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. संतोष ओंकार गायकवाड याच्याविरोधात लुटमारीचे गुन्हे दाखल असून, त्याच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो अडीच वर्षे तुरुंगात होता, अशी माहिती उघडकीस आली आहे. तर राहुल बुधनव याच्यावर लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच मच्छिंद्र ज्ञानदेश सानप हा सध्या जामिनावर तुरुंगातून सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times