नगरचे मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा निकाल सुनावला. आरोपी प्रदीप माणिक कणसे (वय २४, रा. तळणी, जि. लातूर) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी बाजू मांडली. त्यांनी १९ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून युक्तिवाद केला. या खटल्यात महत्वाचे साक्षीदारही फितूर झाले होते. पीडित तरुणी उन्हाळ्याच्या सुट्टीत नगरमधील तिच्या नातेवाईकांकडे आली होती. २७ मे रोजी तिचा प्रियकर आरोपी कणसे नगरला आला. येथे आल्यावर त्याने ऊस तोडण्याचा कोयता खरेदी केला. त्याला धार लावून घेतली. एका पिशवीत तो ठेवून ती तरुणी राहत असलेल्या घरी गेला. दोघे घराच्या छतावर गेले. तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला.
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. शिवाय काही महत्वाचे साक्षीदार फितूर झाले. सरकारी वकील पाटील यांनी परिस्थितीजन्य पुरावा आणि अन्य साक्षीदारांच्या साक्षींवर हा खटला पुढे चालवला. आरोपीनेही बचाव केला. आमचे लग्न तिच्या नातेवाईकांना मान्य नव्हते. त्यामुळे आपण तेथे पोहचण्यापूर्वीच हस्तकांमार्फत तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आपल्याला या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे, असा बचाव आरोपीतर्फे करण्यात आला होता. सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद खोडून काढला. आरोपी प्रदीप यानेच तिच्याकडे लग्नाची मागणी केली होती. तिने ती नाकारल्यामुळे त्याने नियोजनबद्धरित्या तिचा खून केला. यासाठी संबंधित दुकानदार, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाला. कोर्टाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. घटना घडली तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. त्यामुळे यामध्ये बाललैंगिक अत्याचाराचेही कलम लावण्यात आले आहे. आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times