औरंगाबाद: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज पोलिस आयुक्तांकडे एका वकीलाकडून करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी तडाखेबंद भाषण केलं होतं. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर तोफ डागली होती. तसंच, बिहार निवडणुक, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, कंगना राणावत या मुद्द्यावरही भाष्य केलं होतं. यावरूनच औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

अॅड. रत्नाकर चौरे असं या वकीलाचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात भारत देशाची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश सारख्या दहशतवादी आणि मुस्लिम राष्ट्राशी करून भारताचा अपमान केला आहे. तसंच हिंदुत्वाचा त्याग करून त्यांनी राज्याची सत्ता संपादन करून राष्ट्रीय व धार्मिक भावना दु:खविल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
बिहार विधानसभा निवडणुकीत सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसंच, कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला होता. पाकव्याप्त काश्मीर भारतात घेऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणतात. पण प्रत्यक्षात आपल्या ताब्यात जे काश्मीर आहे तेथील जमिनीचा साधा तुकडाही आपण घेऊ शकत नाही, अशी आजची स्थिती आहे. हे सगळे असताना आपल्याच देशातील एखाद्या भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा एकप्रकारे पंतप्रधान मोदींचाच अपमान आहे, असं ते म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here