म.टा. प्रतिनिधी, जळगावः मेगा भरतीमुळेच माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फटका तर बसलाच शिवाय भाजपने सरकार घालवले, अशा शब्दांत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा पक्षावर तोफ डागली.

यांनी शनिवारी जळगावातील त्यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी पत्रकारांसोबत सवांद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसे पुढे म्हणाले की, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या काळात मेगा भरतीला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात या मेगा भरतीला जोर आला. भाजपने मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे ओढले. मात्र, ही करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्या विरोधात सतत दंड थोपटले, अशा नेत्यांनाच स्थान देण्यात आले.

याठिकाणी भाजपच्या राज्य नेतृत्त्वाने आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मेगा भरतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत २२० पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांना तिकीट नाकारले काय? काही फरक पडत नाही, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. त्यानंतर मेगा भरतीत आयात केलेल्या नेत्यांना तिकिटांची खैरात वाटली. परंतु, झाले उलटेच. ज्यांना भाजपने तिकिटे वाटली त्यांना जनतेने साफ नाकारले.

मेगा भरतीचा मलाही फटका

मेगा भरतीचा फटका फक्त पक्षालाच नाही, तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनादेखील बसला आहे, असेही खडसे म्हणाले. आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपने केलेल्या मेगा भरतीचे मूळ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच आता खर बोलण्याची हिंमत दाखविल्याने मी त्यांचे अभिनदंन करतो, असेही खडसे म्हणाले. त्यामुळे आता पक्ष निती बदलेल व सुधारणा करेल, अशी अपेक्षाही खडसे यांनी व्यक्त केली.

संजय राऊतांवर टीका

एकनाथ खडसेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीकास्त्र डागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून पुरावे मागणे चुकीचेच नाही, तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. राऊत यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here