म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाकाळामध्ये शहरात ठिकठिकाणी कोणतीही नोंदणी नसलेल्या वैद्यकीय प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. अनधिकृत लॅबच्या प्रश्नावर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असतानाही, या लॅबची आजतागायत नोंद झालेली नाही. या परिस्थितीचा फायदा घेत काही एमडी पॅथॉलॉजिस्ट एकाच वेळी अनेक ठिकाणी स्वाक्षरी करून आणि प्रत्येक अहवालामागे दरआकारणी करून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. त्यामुळे औषधांच्या दुकानांमधील फार्मासिस्टप्रमाणे पॅथॉलॉजिस्टनाही एकाहून अधिक ठिकाणी काम करण्यास बंदी घालण्यासंबंधी नियमावली केव्हा करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातून निलंबन झालेला रक्तसंक्रमण अधिकारी मुंबई वगळता इतर अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासण्यांच्या अहवालांवर स्वाक्षरी करताना आढळून आला आहे. यापूर्वीही अशा काही जणांच्या तक्रारी आल्या असल्या, तरीही सर्वसामान्यांच्या जिवाशी निगडित असलेल्या या प्रकरणांमध्ये सरकारने अद्याप निश्चित काहीही भूमिका घेतलेली नाही.

वसई विरार महापालिकेमध्ये रजिस्ट्रेशन क्रमाकांची नोंद देणे हे पॅथॉलॉजिस्टसाठी बंधनकारक आहे. अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे शहरातील कोणत्या लॅबमध्ये कोणता पॅथॉलॉजिस्ट काम करतो, हे शोधणे शक्य होते. त्याच्या वैद्यकीय गुणवत्तेची खातरजमा करणेही शक्य होते. मात्र मुंबईसारख्या महानगरामध्ये असे कोणतेही निर्देश अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे मुंबईबाहेर अशा डिजिटल स्वाक्षरी ठोकणे, त्यासाठी प्रत्येक अहवालामागे शुल्क आकारणे असे प्रकार घडतात. एवढेच नव्हे, तर वार्षिक रक्कम दिल्यास शुल्कात एक महिन्याची सवलत देण्याच्या ‘स्कीम’ पॅथॉलॉजिस्टकडून दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे.

प्रत्येक प्रयोगशाळामध्ये एमडी पॅथॉलॉजिस्ट असणे गरजेचे आहे. या पॅथॉलॉजिस्टने संबंधित व्यक्तीला अहवाल देण्यापूर्वी त्याचे सूक्ष्मदर्शीय अवलोकन (मायक्रोस्कोपी) करणे गरजेचे आहे. कोणती उपकरणे वैद्यकीय चाचण्यांसाठी वापरली जातात, हेदेखील तपासायला हवे. एखाद्या रुग्णाच्या वैद्यकीय निदानाच्या अहवालामध्ये रक्तामध्ये गुठळ्या आहेत असे दिसून आल्यास, त्या गुठळ्या कोणत्या कारणांमुळे निर्माण झाल्या, हे तपासायला हवे. त्याची नेमकी माहिती संबंधितांना द्यायला हवी.

वैद्यकीय साक्षरतेची गरज

यासंदर्भात सर्वसामान्यांनी साक्षर होण्याची गरज अधिकृत पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली. लॅबमध्ये गेल्यानंतर तिथे कोणते पॅथॉलॉजिस्ट आहे, यासंदर्भात प्रश्न विचारणे गरजेचे आहे. नमुने घेण्यासाठी घरी येणारी व्यक्ती हे रक्ताचे वा लघवीचे नमुने कोणत्या लॅबमध्ये नेऊन देते, याचीही माहितीही घेणे गरजेचे आहे. मात्र सर्वसामान्यांमध्ये यासंदर्भात जागृती नसल्यामुळे लॅबचालकांच्या संदर्भात कोणतीही विचारणा होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नव्याने आलेल्या लॅबची तपासणी हवी

करोनाकाळामध्ये आरटीपीसीआर, अँटिजन, रक्त चाचण्या अशा अनेक चाचण्या संसर्गाच्या निदानासाठी वापरल्या जात होत्या. अनेक सोसायट्या, कंपन्यांमध्ये प्रवेशापूर्वी या चाचण्यांची अट घालण्यात आली होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन या काळामध्ये मुंबईत उदयाला आलेल्या लॅबचीही तपासणी करण्याची गरज या क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here