वृत्तसंस्था, मुंबई : केंद्र सरकारने घोषणा केल्यानुसार कर्जांच्या हप्तेस्थगितीसंदर्भात व्याजावर लागणाऱ्या व्याजास माफी देण्याची योजना पाच नोव्हेंबरपर्यंत लागू करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सर्व बँकांना दिले आहेत. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जांसाठी सहा महिन्यांची हप्तेस्थगिती घेतली असेल, तर त्यासाठी ही व्याजमाफी मिळणार आहे. या योजनेची घोषणा मागील आठवड्यात, शुक्रवारी करण्यात आली होती.

या योजनेमध्ये विशिष्ट कर्जखात्यांनी सहा महिन्यांची हप्तेस्थगिती (मोराटोरियम) घेतली असेल आणि हे हप्ते संपूर्ण कर्जफेडीचा कालावधी संपल्यानंतर भरण्याचे मान्य केले असेल, तर अशा कर्जखात्यांच्या थकित हप्त्यांवर बँका आकारणार असलेल्या व्याजासाठी अनुदान दिले जाणार आहे. कर्जाच्या हप्त्यामध्ये मुद्दल आणि व्याज या दोघांचा समावेश असतो. अशा थकित हप्त्यावर पुन्हा व्याज आकारणी झाल्यास ती चक्रवाढ पद्धतीने होणार आहे. म्हणून चक्रवाढ आणि सरळ असा दोन्ही व्याजांमधील फरक हा सानुग्रह अनुदान म्हणून केंद्र सरकार देणार आहे. याचाच अर्थ सामान्य कर्जदारांसाठी (ऋणको) व्याजावरील व्याज माफ केले जाणार आहे.

१ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या सहा महिन्यांच्या हप्तेस्थगितीसाठी व्याजमाफीची ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती रक्कम ऋणकोंच्या कर्जखात्यांत पाच नोव्हेंबरपर्यंत जमा करावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँका आणि वित्तसंस्थांना दिले आहेत. यासंबंधीची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जारी केली. यापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २३ तारखेला यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी व्याजमाफीची योजना राबवण्याविषयी दिलेल्या निर्देशांनुसार, ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली. त्या वेळी लवकरात लवकर ही व्याजमाफी देण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले होते.


या कर्जांना योजना लागू –
– घर खरेदीसाठी घेतलेले कर्ज, शिक्षणासाठी घेतलेले कर्ज, क्रेडिट कार्डांची थकित रक्कम भरण्यासाठी घेतलेले कर्ज, वाहनकर्ज; तसेच सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योगांनी (एमएसएमई) घेतलेले कर्ज, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतलेले कर्ज आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी घेतलेले कर्ज असा सर्व कर्जांसाठी हप्तेस्थगिती घेतली असेल, तर ही योजना लागू होणार आहे.

– ज्यांनी हप्तेस्थगिती स्वीकारलेली नाही आणि जे नियमित कर्जहप्ते भरत आहेत, अशांनाही ही योजना आता लागू होणार आहे. त्यामुळे अशा ऋणकोंचा लाभ होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here