म. टा. प्रतिनिधी, : पार्टी केल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास झालेल्या वादानंतर आपसात हाणामारी झाली. यानंतर मॉन्टी सिंह बिहारी उर्फ मंटूश कुमार सिंह याचा कपिल रापते (रा. बीड बायपास) याने खून केला, अशी माहिती छावणी पोलिसांनी दिली. छावणी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने रापते याला मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी कुरकुंभ (ता. दौंड) येथून अटक केली. कपील रापते हा राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याची माहितीही समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११च्या सुमारास मिटमिटा येथील पीस सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मंटूश अनिल कुमार सिंह (३०, रा. कुंज, ओहारी, ता.नवादा, बिहार) याची चाकू भोसकून करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी छावणी पोलिसांसह गुन्हे शाखेची दोन पथकेही तयार करण्यात आली होती.

या प्रकरणात छावणी पोलिसांच्या पथकाला हत्या झाल्याच्या दिवशी कपिल रापते याचे ‘मोबाइल लोकेशन’ याच भागात असल्याची माहिती मिळाली होती. याशिवाय मृत मॉन्टींचा भाऊ अमित कुमार यानेही रापते याच्यावर संशय व्यक्त केला होता. या माहितीच्या आधारावर छावणी पोलिसांचे एक पथक संशयित कपिल रापते याच्या शोधात होते. सहा दिवसानंतर पोलिसांनी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास कपिल रापते याला कुरकुंभ (ता. दौंड) येथे एका मित्राच्या घरातून ताब्यात घेतले. त्याला रात्री उशिरा छावणी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

कपिल रापते याने १९ ऑक्टोबरच्या रात्री दोनच्या सुमारास मॉन्टीसोबत वाद झाल्याची माहिती पोलिसांना दिली. या वादानंतर दोघांमध्ये हाणामारी झाल्याचेही कबूल केले आहे. या वादातून कपिलने खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. खून केल्यानंतर कपिल मोटारसायकलवरून पुण्याच्या दिशेने गेला होता, अशीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अन्य काही आरोपीही असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन वायाळ, पोलिस कर्मचारी अशोक नागरगोजे, रोहित चिंधाळे, एन. डी. पायघन आणि टी. के. शिंदे यांनी केली.

नवीन सीम कार्डमुळे फसला

संशयित मारेकरी कपिल रापते हा घटन घडल्यापासूनच बेपत्ता होता. त्याच्या शोधात पोलिस निरीक्षक सचिन वायाळ यांच्यासह पाच जणांचा पथक रवाना झाले होता. त्याच्या ‘लोकेशन’ची माहिती सायबर विभागाकडून दिली जात होती. त्याआधारे गेल्या सहा दिवसांपासून कपिलचा शोध सुरू होता. पुणे, पिंप्री चिंचवड येथेही पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याने मोबाइल वापरणेही बंद केले होते. अखेर मंगळवारी त्याने मोबाइलमध्ये नवीन सीम कार्ड बसविले आणि एका मित्राला फोन केला. या फोनवरून कपिलच्या ‘लोकेशन’ती माहिती मिळाली.

प्रेयसीवरून वाद

कपिल रापते उर्फ राजे हा परभणी राहत होता. गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून ते औरंगाबादेत आहे. येथे तो खाजगी फायनान्स कंपनीत वाहन जप्ती विभागात कंत्राटी पद्धतीने कामावर होता़ त्याची आणि मॉन्टीची ओळख तीन वर्षांपूर्वीची आहे. मॉन्टीच्या प्रेयसीकडे रापते थांबत होता. त्यामुळे मॉन्टी आणि रापते यांच्या वाद ही झाला. ‘लॉकडाऊन’च्या काळात मॉन्टीसह त्याच्या मित्रांनी पडेगाव येथील बंद असलेल्या एका ढाब्यात नेऊन कपिलला बेदम मारहाण केली होती़ त्यानंतर प्रेयसिला घेऊन मॉन्टी हा तीन महिने मिटमिटा भागातील पीस होम सोसायटीतील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होता. या वादातून खून झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here