देशभरातील ४१ आयुध निर्माणींपैकी येथील अंबाझरी आयुध निर्माणी महत्वाचा भाग आहे. लष्कराच्या तिन्ही दलांना लागणारे बोफोर्स आणि पिनाकारसारखे महत्वाचे तोफगोळे व रॉकेट्सचे हार्डवेअर येथे तयार होते. यासोबतच विविध तोफगोळ्यांना लागणारे अतिमहत्त्वाचे फ्युजदेखील अंबाझरी आयुध निर्माणीत तयार केले जातात. आयुध निर्माणी मंडळांतर्गत तिरूचिलापल्ली येथील निर्माणी ही रायफलसाठी प्रसिद्ध आहे. याच निर्माणीने अॅन्टी मटेरिअल रायफल अर्थात एएमआर विकसित केली आहे. ‘विध्वंसक’ असे नाव असलेल्या रायफलचा उपयोगदेखील विनाशक पद्धतीचाच आहे. शत्रूचे बंकर्स, रडार्स, उभे असलेले विमान, इंधन टाकी आदी नष्ट करण्याची क्षमता या रायफलमध्ये आहे. आता या रायफल्सची मोठ्या प्रमाणात बीएसएफने मागणी केली आहे. मोठी मागणी आल्यानेच त्याच्या बुलेट्स तयार करण्याचे काम अंबाझरी आयुध निर्माणीकडे आहे. आयुध निर्माणी मंडळांतर्गत कार्य करणाऱ्या ४१ आयुध निर्माणींची एकूण उलाढाल ही १२५ अब्ज रुपयांच्या घरात आहे. त्यामध्ये अंबाझरीचा वाटा ६८० कोटीच्या जवळ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजनाथसिंग यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भेटीप्रसंगी आयुध निर्माणी मंडळाचे अध्यक्ष हरिमोहन यांनी राजनाथसिंग यांना शस्त्रांविषयी माहिती दिली.
लष्कराप्रमुखांचे वक्तव्य आणि भेट
सद्य:स्थितीत देशाला अंतर्गत आणि बहिर्गत असा दोन्ही प्रकारच्या युद्धाचा धोका दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी संसदेने आदेश दिल्यास पीओकेवर कब्जा मिळवू, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सातत्याने हा मुद्दा चर्चेत राहिला. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्यात लखनऊ येथे भारतीय शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. त्यामध्ये आधुनिक आणि पूर्णत: स्वदेशी शस्त्रेदेखील ठेवण्यात आली आहे. या शस्त्रांच्या निर्मितीमध्ये अंबाझरी आयुध निर्माणीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
मा. गो. वैद्यांसोबत चर्चा
नागपूर भेटीदरम्यान राजनाथसिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ता मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी ९६ वर्षीय ‘मागो’ यांच्या स्वास्थ्याविषयी आस्थेने चौकशी केली. अल्पावधीच्या या भेटीदरम्यान त्यांनी ‘मागो’ यांचे आशिर्वाद घेतले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times