: शिवसेनेचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी स्वतः नानलपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

या संदर्भात खासदार जाधव यांनी, ‘माझ्या जीवाला धोका असून, आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचण्यात येत आहे,’ अशी तक्रार परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दिली. आपल्याला दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

याबाबत परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला आहे, असे खासदार जाधव यांनी पोलिसांना सांगितले. नांदेडमधील एक मोठी टोळी यात सक्रिय आहे असे सांगतानाच, आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देणारी व्यक्ती ही परभणीतील असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. परभणीतील ‘ही’ बडी व्यक्ती कोण असावी, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहे. विशेष म्हणजे ही माहिती आपणास विश्वासू व्यक्तीकडून समजली असल्याचे देखील खासदार जाधव त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

जाधव यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्याने नानलपेठ पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here