दुबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या संघ निवडीवरुन एकच हलकल्लोळ पाहायला मिळत आहे. रोहित शर्माला भारतीय संघात स्थान न दिल्याबद्दल चाहते नाराज आहेत. पण दुसरीकडे मात्र ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सन्मान केल्याचे पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने ज्यापद्धतीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी धोनीला वागणूक दिली आहे, त्याबद्दल चाहतेही खूष असल्याचे पाहायला मिळत आहे.

करोनाच्या काळानंतर भारताचा हा पहिलाच दौरा असणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तो थेट आयपीएलमध्ये आपल्याला दिसला. पण आता आयपीएल काही दिवसांनी संपणार आहे आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. आपल्या या करोनानंतरच्या पहिल्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलच्या कव्हर पेजवर धोनीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली, धन्यवाद एमएस धोनी… असे बीसीसीआयने म्हटले आहे. चाहत्यांना ही गोष्ट चांगलीच पसंत पडली असल्याचे पाहायला मिळत आहे.

धोनीने १५ ऑगस्टच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर काही वेळातच सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आ़पली निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आयपीएल खेळण्यासाठी धोनी चेन्नईच्या संघाबरोबर युएईमध्ये दाखल झाला होता. पण धोनी आणि त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच त्यांचे बाद फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे धोनी आता भारताकडून खेळताना दिसणार नाही, हे तर निश्चितपणे समजले जात आहे. पण धोनी यापुढे आयपीएल तरी खेळणार का, याबाबतही चाहत्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारताचा संघ या दौऱ्यात चार कसोटी सामने आणि प्रत्येकी ३ सामन्यांची वनेड आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७, २९ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी वनडे सामने होतील. त्यानंतर ४,६ आणि ८ डिसेंबर रोजी टी-२० लढत होईल. कसोटी मालिकेची सुरूवात १७ डिसेंबरपासून होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here