मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री यांच्यावर वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

शबाना आझमी यांच्यावर कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात (एमजीएम) उपचार सुरू होते. तिथून अधिक उपचारांसाठी त्यांना सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी यांनी माहिती दिली असून शबाना यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शबाना यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे, असे शेट्टी यांनी नमूद केले.

शबाना यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना

शबाना आझमी अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच स्तरांतून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शबाना यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. शबाना यांना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली. भारतरत्न लता मंगेशकर यांनीही शबाना यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. शबाना यांच्या प्रकृतीची बॉलिवूडलाही काळजी लागली आहे. शबाना यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी रुग्णालय गाठत आहेत. जावेद अख्तर यांचा मुलगा अभिनेता फरहान अख्तर तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात पोहचला. उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेता अनिल कपूर, अभिनेत्री तब्बू यासह अनेक सेलिब्रिटी व मान्यवरांनी रुग्णालयात जावून शबाना यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

खालापूरजवळ झाला अपघात

शबाना आझमी व त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर कारने पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांना भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात शबाना व कारचालक गंभीररित्या जखमी झाले तर जावेद अख्तर यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. शबाना व कारचालकाला प्रथम कळंबोली येथील एमजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर तिथून शबाना यांना मुंबईत हलवण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here