म.टा.प्रतिनिधी, नगर: शिवसेनेचे दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा मुलगा युवासेनेचे विक्रम राठोड यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करा, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे नगरमधील शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसे पत्रही ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता या पत्राचा विचार करून राठोड यांना संधी मिळणार का? याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

‘नगर जिल्ह्यात गेल्या चाळीस वर्षापासून पक्ष वाढीचे काम स्वर्गीय अनिलभैय्या राठोड यांच्या रुपाने चालु होते. संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम अनिलभैय्यांनी केले. करोना काळात संपूर्ण नगर शहर आणि जिल्ह्यात जेवण व गरजुंना अन्नधान्य पुरविण्याचे काम व वैद्यकीय मदत सर्वसामान्यांना पुरविण्याचे काम त्यांनी केले. त्यातच त्यांना करोनाची लागण झाली, व त्यांचे निधन झाले. अनिलभैय्या यांच्या जाण्याने नगर शहर व जिल्ह्यात एकही शिवसेना आमदार नाही. त्यामुळे जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झालेली असून शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी अनिलभैय्या यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी विक्रम राठोड यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्ती करावी,’ असे या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.

शिवसेना नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक यांच्या लेटरहेडवर अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. त्यामुळे आता विक्रम राठोड यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का?, याकडे नगरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here