नवी दिल्ली: केंद्रीय परिवहन मंत्री बुधवारी झालेल्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority of India) कामात झालेल्या ढिलाईमुळे अधिकारी वर्गावर चांगलेच संतापले. गडकरी यांनी भवनाच्या उद्घाटनाच्या ऑनलाइन कार्यक्रमात प्राधिकरणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. २५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सन २००८ मध्ये निश्चित झाला होता. या प्रकल्पाचे टेंडर २०११ मध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर ९ वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला, अशी माहिती गडकरी यांनी या कार्यक्रमात दिली.

गडकरी यांनी यांनी नाराजी जाहीर करत म्हटले की, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन सरकारे आणि ८ चेअरमन लागले. विद्यमान चेअरमन आणि सदस्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. मात्र ज्या महान व्यक्तीमत्वांनी हे काम करण्यासाठी २०११ ते २०२० हा ९ वर्षांचा कालावधी लावला त्याचे फोटो नक्कीच या कार्यालयात लावा. याच लोकांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास ९ वर्षे लावली हे कळावे, असे गडकरी म्हणाले.

गडकरी म्हणाले की, आपण अभिमानाने सांगत असतो की ८० हजार ते १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार आहोत. मग जर एवढ्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या मोठ्या कामाला फक्त तीन साडेतीन वर्ष लागणार असतील, तर या दोनशे कोटींच्या कामासाठी आपण दहा वर्ष घालवली. हे अभिनंदन करण्यासारखं आहे का?, असे म्हणत मला हे सांगायची लाज वाटत असल्याचे गडकरी म्हणाले. विकृत विचारांच्या अधिकाऱ्यांनी निर्णय न घेता समस्या निर्माण केल्या. हे अधिकारी १२-१३ वर्षांपासून चिकटूनच बसले आहेत. हे लोक नवीन येणाऱ्या अध्यक्षाचे मार्गदर्शक बनतात. हे सगळे नकारात्मक आणि विकृत आहे, अशा शब्दात गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

इतक्यावरच न थांबता गडकरी पुढे म्हणाले की, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी मला शंका नाही, पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. मला हे कळत नाही की, अशा विकृत लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारले जाते? मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचे उदाहरण म्हणजे ही इमारत आहे, असा शाब्दिक घणाघात गडकरी यांनी केला. या कामात सहभागी असलेल्यांवर आता एक संशोधनपर निबंधच करावा. या संस्थेचे मोठे नाव असूनही नालायक लोकांना घेतल्यामुळे अखेर आपण अपयशीच ठरलेलो आहोत, असे गडकरी पुढे म्हणाले.

‘कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलणे हे माझे उद्दिष्ट’

या मार्गाचे काम पूर्ण करण्यापेक्षा आता या कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून देणे हेच माझे उद्दिष्ट बनले असल्याचे गडकरी म्हणाले. मला मंत्र्यांचे अधिकार काय आहेत याची माहिती आहे. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचं वाईट करावे असे मला वाटत नाही, पण आता अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे मला वाटू लागले आहे, असे गडकरी पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

हे काम सुरू असताना देशात तीन सरकारे बदलून गेली. हे काम पूर्ण झालेलं बघण्यासाठी तीन सरकारे बदलली. हे पाहता मी तुमचे काय अभिनंदन करणार, असे सांगत मला तुमचे अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे, अशा शब्दात गडकरींनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here