आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचे फलंदाज एका टोकाकडून बाद होत असताना सूर्यकुमारने झुंजार अर्धशतक साकारले आणि संघाला डाव सावरला. सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवला. आरसीबीने यावेळी मुंबईपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हे आव्हान लीलया पेलले. सूर्यकुमारने यावेळी ४३ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली.

आरसीबीने यावेळी मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला क्विंटन डीकॉक आणि इशान किशन यांनी ३७ धावांची सलामी करून दिली. आरसीबीच्या मोहम्मद सिराजने यावेळी डीकॉकला बाद केले आणि मंबईला पहिला धक्का दिला. डीकॉकला यावेळी १८ धावाच करता आल्या. डीकॉक बाद झाल्यावर काही वेळातच आरसीबीच्या युजवेंद्र चहलने किशनला बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. किशनला यावेळी २५ धावाच करता आल्या.

किशन बाद झाल्यावर मुबंईला अजून दोन धक्के बसले. मुंबईच्या सौरभ तिवारीला यावेळी पाच धावा करता आल्या, तर कृणाल पंड्याने १० धावा केल्या. पण मुंबईचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना मुंबईच्या डावाला आधार दिला तो सूर्यकुमार यादवने. या सामन्यात सूर्यकुमारने झुंजार अर्धशतक पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.

जसप्रीत बुमराचा भेदक मारा आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. बुमराने या सामन्यात आयपीएलमधील १०० आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील २०० बळी पूर्ण केले. त्याचबरोबर या सामन्यात एकाच षटकात त्याने दोन बळी मिळवण्याचीही किमया साकारली. आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर बुमराने आरसीबीच्या धावसंख्येला वेसण घातले. त्यामुळेच देवदत्त पडीक्कलच्या अर्धशतकानंतरही आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळेच आरसीबीला मुंबईपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवता आले. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. त्याचबरोबर बुमराने एकाच षटकात अर्धशतकवीर देवदत्त पडीक्कल आणि शिवम दुबे यांना बाद करण्याची किमयाही साधली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here