कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांचे महाराष्ट्रातील साहित्यामध्ये मोठे योगदान आहे. संजय राऊत यांनी गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, अभिनेते रजनीकांत यांचा आवर्जून उल्लेख केला. बेळगावमध्ये मराठी भाषेची मशाल पेटलेली आहे. बेळगावमध्येच नाही तर महाराष्ट्रातही मराठीसाठी लढावे लागते. भाषे-भाषेमध्ये वाद असायला नको, कारण देश एक आहे. मुंबई, सोलापूरसह इतर महाराष्ट्रतील जिल्ह्यातील कानडी भाषेंच्या शाळांना अनुदान देण्याचे काम आम्ही करतोय. ज्या महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे, तेथील कन्नड शाळा टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील शाळांना अनुदान किंवा हवी ती मदत केली जाते. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठिकाणी कन्नड शाळांना अनुदान दिले आहे, असे राऊत म्हणाले.
बेळगाव येथील व्याखानासाठी संजय राऊत यांचे शनिवारी दुपारी बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेने विमानतळ परिसर दणाणून सोडला होता. राऊत यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर कन्नड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संजय राऊत यांनी एका मुलाखतीत विविध विषयावर आपले मते व्यक्त केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद, मात्र कौटुंबिक नाते अजूनही कायम आहे. शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केले नसते तर देशाला संजय राऊत दिसला नसता, असेही ते एका प्रश्नावर बोलताना म्हणाले. वृत्तपत्रांमध्ये क्रांती करण्याची तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उलथापालथ करण्याची ताकद आहे, असेही ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times