म. टा. प्रतिनिधी, पुणेः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे ६६ कोटी ९७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका सुमारे एक लाख ७२ हजार ८७१ नागरिकांना बसला असून, सर्वाधिक नुकसान इंदापूर तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल पुरंदर आणि बारामती तालुक्यात शेती, फळबागा आणि शेतजमिनींचे नुकसान झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार सुमारे ६६ कोटी ९७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये शेतीच्या नुकसानाबरोबरच घरे आणि गोठ्यांची झालेली पडझड, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती आणि जनावरे यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एक हजार ६०४ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. या गावांतील एक लाख ७२ हजार ८७१ नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या गावांमधील सुमारे ६८ हजार हेक्टर क्षेत्रफळावरील पिके, फळबागा आणि घरांचे नुकसान झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सर्वाधिक नुकसान इंदापूर तालुक्यात झाले असून, या तालुक्यातील सुमारे १४ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रफळ बाधित झाले आहे. त्यानंतर पुरंदर तालुक्यात १२ हजार २३३ हेक्टर, बारामती तालुक्यातील १० हजार ४५९ हेक्टर क्षेत्रफळ बाधित झाल्याचे आढळले आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सुमारे ६६ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांना लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने ३४ हजार हेक्ट रवरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीने सांगली जिल्ह्यातील ३४ हजार ८८ हेक्टकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारी नियमानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण झाले. ७५ हजार ४०१ शेतकऱ्यांचे सुमारे ३७ कोटी ६५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवला असून, लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here