भोपाळः मध्य प्रदेशातील २८ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या केवळ ५ दिवस आधी भाजपने आपला जाहिरनामा जाहीर प्रसिद्ध केला. अलिकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना मात्र जाहीरनाम्यात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांचा साधा फोटोही जाहिरनाम्यात नाहीए. तसंच मध्य प्रदेशातील सर्वांना करोना लस मोफत देण्याचं आश्वासन पक्षाने दिलं आहे.

जाहिरनामा प्रसिद्ध होण्याच्या ५ दिवस आधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात फक्त गरीबांनाच मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली होती. ग्वाल्हेरमध्ये भाजपाचे उमेदवाराच्या प्रचारसभेत त्यांनी ही घोषणा केली. यानंतर त्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला करोना लस मोफत दिली जाईल, असं ट्विट केलं. पण नंतर काही काळानंतर त्यांनी हे ट्विट हटवलं.

मुख्यमंत्र्यांचं ट्विट आणि नंतर ते हटवल्याने करोना लसीबाबत राज्यात संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करत पक्षाने आपल्या जाहिरनाम्यातून संपूर्ण जनतेला करोनावरील लस मोफत देण्याचं आश्वासन दिलंय.

जाहिरनाम्याच्या केंद्रस्थानी शेतकरी

जाहीरनाम्यात शेतकर्‍यांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलंय आहे. यात सरकारने शेतकर्‍यांसाठी घेतलेले निर्णय आणि योजनांचा उल्लेखही आहे. त्याशिवाय स्थानिक प्रश्नांविषयी स्वतंत्र स्तंभ तयार केला गेला आहे. त्यामध्ये विधानसभा स्तरावर विकासाच्या स्थानिक प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

काँग्रेसचा भाजपवर निशाणा

करोनावर अजून लसही आलेली नाही तरीही मोफत लस देण्याचं आश्वासन भाजपने जाहिरनाम्यातून दिलंय. भाजप करोनासारख्या आजाराचाही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यास उत्तर म्हणून कॉंग्रेसचे आरोपपत्र

कॉंग्रेसने भाजपच्या जाहीरनाम्यास उत्तर देताना आरोपपत्र जारी केलं आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष अरुण यादव, अजय सिंह आणि माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी बुधवारी भोपाळ येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ‘शिवराज सरकार आले, नवीन घोटाळे केले’ अशी घोषणा त्यांनी दिली.

शिवराज सरकारने ७ महिन्यांत १७ घोटाळे केले आहेत. त्यात पीठ चोरी घोटाळा, त्रिकूट चूर्ण घोटाळा, दारू एमआरपी घोटाळा, उद्योग बदली घोटाळा, सरकारी खरेदी घोटाळा, बनावट वीज बिल घोटाळा, पीपीई किट घोटाळा, माध्यान्ह भोजन घोटाळा, पंतप्रधान सन्मान निधी घोटाळा, सौभाग्य योजना, तांदूळ घोटाळा यासह जुन्या घोटाळ्यांचा उल्लेख देखील केला आहे. यात डंपर घोटाळा, व्यापमं घोटाळा, होशंगाबाद वाळू घोटाळ्याचाही समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here