घोटाळ्यात ग्राहक आणि वाहिन्या यांच्यामधील आर्थिक देवाणघेवाणीतील प्रमुख दुवा असलेला मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबई पोलिसांची पथके देशभरात फिरत असल्याचे लक्षात येताच डिस्ट्रिब्युशन कंपनीचा मालक आशीष चौधरी बुधवारी पोलिसांना शरण आला. आशीष हा हंसा कंपनीच्या अटकेत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांना ग्राहकांना वाटण्यासाठी पैसे पुरवत होता. त्याच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या ११वर पोहोचली आहे.
पैसे देऊन टीआरपी वाढवून देण्याच्या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने याआधी दहा जणांना अटक केली असून यातील अभिषेक कोलावडे या आरोपीच्या चौकशीत आशीष चौधरी याचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या कामकाजाचा आवाका देशभरात असल्याने विशेष पथके तयार करण्यात आली. याची कुणकुण लागताच आशीषने बुधवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.
बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या दोन वाहिन्यांच्या मालकानंतर आशीषची अटक मोठी आणि महत्त्वाची असल्याचे विशेष पथकातील तपास अधिकारी सचिन वाझे यांनी म्हटले आहे. आशीष हा हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांना भारत आणि वॉव म्युजिक या दोन वाहिन्या चालू ठेवण्यासाठी पैसे देत होता. हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांनी हे पैसे अनेक ग्राहकांना दिल्याचेही उघड झाले आहे. तो दोन वर्षांपासून पैसे देत होता. काही ठिकाणी चेकने तर अनेकदा रोखीने व्यवहार झाल्याने त्याच्याकडे हा पैसा हवालामार्गे येत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने देखील विशेष पथकाचा तपास सुरू आहे.
४६ जणांचे जबाब
टीआरपी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत सुमारे ४६ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणात अटक केलेला अभिषेक वेगवेगळ्या नावाने वावरत होता त्यामुळे त्याची ओळख परेड केली जाणार आहे. दरम्यान महामूव्ही वाहिनीचे मार्केटिंग प्रमुख अमित दवे, सीईओ संजीव वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times