अहमदाबाद: काँग्रेस नेते यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. विरमगावजवळील हासलपूर येथून हार्दिक यांना अटक करण्यात आली. कोर्टाने हार्दिक यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली. हार्दिक यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे माजी नेते हार्दिक पटेल सध्या काँग्रेसचे नेते आहेत. पाटीदार आरक्षणासाठी २५ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या विशाल सभेनंतर गुजरातच्या विविध भागांत हिंसाचार उसळला होता. मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांच्यावर ऑक्टोबर २०१५ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीला हार्दिक पटेल वारंवार गैरहजर राहत असल्याने अहमदाबादच्या एका कोर्टाने त्यांच्याविरुद्ध आज अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट जारी झाल्यानंतर हार्दिक यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हार्दिक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करतानाच कोर्टाने त्यांना २४ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. त्यापूर्वीच पोलिसांनी हार्दिक यांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पाटीदार आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून २५ ऑगस्ट २०१५ रोजी अहमदाबादमधील जीएमडीसी मैदानावर विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर संपूर्ण गुजरात राज्यात हिंसाचार उसळला होता. त्यात अनेक सरकारी वाहने, पोलीस चौक्या जाळण्यात आल्या होत्या. सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पोलीस गोळीबारात किमान डझनभर व्यक्तींना जीव गमवावा लागला होता. त्यात एका पोलिसाचाही मृत्यू झाला होता.

…म्हणून झाली अटक

हार्दिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील लोकनियुक्त सरकार हटवण्यासाठी हिंसाचार भडकवण्याचे षडयंत्र रचले, असा आरोप पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अहमदाबादच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून आजच्या सुनावणीला हार्दिक गैरहजर राहिल्याने न्या. बी. जे. गणात्रा यांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले व याप्रकरणी पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी निश्चित केली. याप्रकरणी हार्दिक यांना हायकोर्टाकडून सशर्त जामीन मिळालेला होता. खटल्याच्या सुनावणीत सहकार्य करण्याबाबत कोर्टाने त्यांना बजावले होते. मात्र, कोर्टाचा ते वारंवार सुनावणीस गैरहजर राहत असल्यानेच त्यांना अटकेला सामोरे जावे लागले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here